अवघ्या दहा मिनिटांत मायलेकाला संपवलं, तपास अधिकारी बदलले अन् पंढरपूरमधील ‘त्या’ क्राईम मिस्ट्री

Pandharpur Crime News: आषाढी वारी संपल्यानंतर पंढरपूर शहरात घडलेल्या मायलेकाच्या निर्घृण दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरले होते. या घटनेनंतर तब्बल आठ महिने उलटूनही आरोपींचा छडा लागत नसल्याने पोलिसांवर प्रचंड दबाव होता. तपासासाठी आंदोलने झाली, तपास अधिकारी बदलले; मात्र या खुनाचे कोडे उलगडत नव्हते. अखेर या प्रकरणाचा तपास IPS अधिकारी प्रशांत डगळे यांच्याकडे आला आणि अवघ्या एका महिन्यात या दुहेरी हत्येचा उलगडा करत आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले.

Pandharpur Crime News भर वस्तीत दहा मिनिटांत मायलेकाची हत्या

पंढरपूर शहरातील लखन संजय जगताप हा तरुण आणि त्याची आई सुरेखा जगताप यांची रात्री साडेनऊच्या सुमारास भर वस्तीतील त्यांच्या घरात घुसून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. आधी लखनवर तब्बल 16 वार करण्यात आले. हा प्रकार पाहणाऱ्या आई सुरेखालाही नऊ वार करून ठार मारण्यात आले. अवघ्या दहा मिनिटांत हे दुहेरी हत्याकांड करून आरोपी फरार झाले होते.

Pandharpur Crime News: CCTV नाही, धागेदोरेही नाहीत; तरी तपासाची नव्याने सुरुवात

या प्रकरणात घटनास्थळी कोणताही CCTV पुरावा उपलब्ध नव्हता. तपासाचे ठोस धागेदोरे मिळत नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे होते. सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी सुरुवातीपासून तपासाला नव्याने सुरुवात केली. तब्बल दीड हजार फोन कॉल्स आणि इंटरनेट रेकॉर्ड्स तपासून पाहण्यात आले. याच डिजिटल तपासातून संशयाची साखळी तयार होत गेली.

Pandharpur Crime News: पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

डगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खुनासाठी गवत कापण्याच्या मशीनच्या पात्यांपासून खास हत्यार तयार करण्यात आले होते. पोलिसांना गोंधळात टाकण्यासाठी आरोपींपैकी एक विशाल शिंदे नाईक याने स्वतःच पोलीस ठाण्यात फोन करून खुनाची माहिती दिली होती. यामुळे सुरुवातीला तपास चुकीच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न झाला. तसेच, हत्येनंतर आरोपींनी घरातील 55 इंची टीव्ही आणि काही साहित्य नेले होते. मात्र हा चोरीचा प्रकार नसून, पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मुद्दाम चोरीचा बनाव केल्याचे तपासात स्पष्ट झाले.

Pandharpur Crime News: अल्पवयीनाचा सहभाग, खबऱ्याच्या मदतीने उलगडा

या हत्याकांडात एका अल्पवयीन मुलाने आरोपींना मदत केल्याचेही समोर आले आहे. खुनाच्या वेळी पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीशी पोलिसांच्या खबऱ्याने मैत्री करून त्याच्याकडून महत्त्वाची माहिती मिळवली. यानंतर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. या दुहेरी हत्याकांडात विशाल शिंदे नाईक याने अथर्व शिंदे नाईक यांच्या मदतीने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी आणि जगताप कुटुंबीय हे शेजारी राहत होते. त्यांच्यातील वैमनस्य हेच खुनामागील प्रमुख कारण असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Pandharpur Crime News: राजस्थानपर्यंत आरोपींचा माग

हत्या केल्यानंतर आरोपी राजस्थानला कामासाठी गेल्याचे तपासात निष्पन्न झाले. हत्येच्या वेळी विशालचा मोबाईल फोन सुमारे एक तास बंद होता. फोन बंद करण्यापूर्वी त्याने सहआरोपी अथर्वशी संपर्क साधल्याचे ठोस पुरावे पोलिसांच्या हाती लागले. याच आधारावर दोघांनाही अटक करण्यात आली.

Pandharpur Crime News: चंद्रभागेतून टीव्ही व हत्यार जप्त

अधिक चौकशीत आरोपींनी चोरी केलेला 55 इंची टीव्ही आणि खुनासाठी वापरलेले हत्यार चंद्रभागा नदीपात्रात फेकल्याची कबुली दिली. पोलिसांनी चंद्रभागेतून हे साहित्य जप्त केले आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे गेल्या आठ महिन्यांत पंढरपूर पोलिसांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. मात्र तपासाची सूत्रे IPS अधिकारी प्रशांत डगळे यांच्या हाती आल्यानंतर अवघ्या एका महिन्यात संपूर्ण हत्येचा उलगडा झाला आणि आरोपी गजाआड झाले.

आणखी वाचा

Malegaon Tipu Sultan Photo Row: उपमहापौरांच्या दालनात झळकला टिपू सुलतानचा फोटो; शिवसेना-हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, मालेगावात राजकारण तापलं!

आणखी वाचा

Comments are closed.