Pandharpur News – कार्तिकी वारीची सांगता; नगरपरिषदेची विशेष मोहीम, 1600 कर्मचाऱ्यांची शहर स्वच्छतेसाठी नियुक्ती
कार्तिकी वारीची गर्दी ओसरल्याने, पंढरपूर नगरपरिषदेने शहर स्वच्छतेची मोहीम युद्धपातळीवर हाती घेतली असून त्यासाठी 1600 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वारकरी भाविक व शहरवासीयांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने दररोज 90 टन कचरा गोळा करण्याचे उद्दिष्ट आहे. येत्या दोन दिवसांत शहर चकाचक होईल, असा विश्वास मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दैनिक सामनाशी बोलताना व्यक्त केला.
कार्तिकी वारीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक दाखल झाले होते. यात्रा कालावधीत पंढरपूर शहर व परिसरात विविध ठिकाणी दिंड्यासह वारकरी, भाविक वास्तव्य करत होते. दशमी एकादशी व व्दादशी या तीन दिवशी मोठी गर्दी असल्याने कचरा उचलण्याचे काम संथ गतीने करावे लागत असते. शहरात साचलेल्या कचऱ्यामुळे वारकरी, भाविकांसह स्थानिक नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होऊ नये यासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबविली जाते.
शहरासह नदीपात्र, वाळवंट, भक्ती सागर, पत्रा शेड, प्रदक्षिणा मार्ग, मंदीर परिसर, वाखरी पालखी तळ आदी ठिकाणच्या स्वच्छतेसाठी जवळपास 1600 स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये नगरपरिषद पंढरपूरचे 350 कायम इतर 100 कर्मचारी तर जवळपास 1068 हंगामी कर्मचारी व 80 सुपरवायझर तसेच नवी मुंबई महानगरपालिकेकडून 50 स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पथक, जिल्ह्यातील इतर नगरपालिकेकडून जिल्हा प्रशासनामार्फत 30 पथके स्वच्छतेसाठी नेमण्यात आले आहेत.
या पथकामार्फत दररोज 90 टन कचरा गोळा करण्यात येत आहे. 41 घंटागाडी द्वारेही कचरा गोळा करण्याचे काम यात्रा कालावधीत अहोरात्र सुरू आहे. शहरामध्ये कचरा त्वरीत उचलण्यासाठी आरोग्य विभागाकडील 4 टिपर, 2 कॉम्पॅक्टर, 1 डंपरप्लेसर, 6 डंपिंग ट्रॉलिने व जेसीबीच्या सहाय्याने दररोज 80 ते 90 टन कचरा उचलण्यात येत आहे.
पंढरपुरातील, मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, पत्राशेड दर्शन बारी, भक्ती मार्ग, वाखरी, 65 एकर, संतपेठ, स्टेशन रोड, जुनिपेठ, गोविंदपुरा, मनिषा नगर, पालखी तळ तसेच नदीपात्रातील वाळवंट येथील स्वच्छता करण्यात आली. जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद व प्रांत अधिकारी तथा नगरपालिका प्रशासक सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यधिकारी महेश रोकडे, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे यांनी शहर स्वच्छतेबाबत सूक्ष्म नियोजन केलेले दिसत आहे.
Comments are closed.