‘भीमा’काठी अवैध वाळूसाठा जप्त, गुरसाळे, शेळवेतील कारवाईत सव्वा कोटीचा मुद्देमाल जप्त

अवैध वाळूउपसा आणि वाहतुकीविरोधात पोलीस प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली आहे. पोलीस पथकाने गुरसाळे व शेळवे येथील भीमा नदीपात्रात जेसीबीच्या साहाय्याने अवैधरीत्या वाळूउपसा करून वाहतूक करताना कारवाई केली. यात 50 ब्रास वाळूसाठा जप्त करण्यात आला आहे. गुरसाळेत 58 लाख 80 हजार, तर शेळवेत 67 लाख 8 हजार रुपये, असा एकूण 1 कोटी 25 लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी दिली.

गुरसाळे येथील भीमा नदीपात्रात जेसीबीच्या साहाय्याने वाळूउपसा करून टिपर व ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाहतूक करीत होते. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत एक जेसीबी, दोन टिपर, एक टेम्पो, दोन ट्रक्टर, एक मोटारसायकल, तसेच 25 ब्रास वाळू, असा एकूण 58 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसऱ्या घटनेत शेळवे येथील भीमा नदीपात्रात अवैध वाळूउपसा व वाहतूक सुरू असताना कारवाई करण्यात आली. एक जेसीबी, दोन टिपर व अंदाजे 25 ब्रास वाळू, असा एकूण 67 लाख 8 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. येथे कारवाई करीत असताना कॉन्स्टेबल दिगंबर भंडारवाड यांना धक्काबुक्की करून वाळू तस्कर पळून गेले.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नीलेश रोंगे, महेश कांबळे, दिगंबर भंडारवाड, शिवशंकर हुलजंती, राहुल लोंढे, विनोद शिंदे, वैभव घायाळ यांनी ही कारवाई केली.

यांच्यावर करण्यात आली कारवाई

गुरसाळे येथील कारवाईत सोमनाथ गणपत शिरतोडे, पंकज कोळेकर, विनोद कोळेकर, विनोद चव्हाण, वैभव कोळेकर, समाधान चव्हाण, अतुल अनुरथ पवार, सौदागर अभिमान शिंदे व इतर तीन ते चारजणांवर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर शेळवे येथील कारवाईत विकास उत्तम बागल, तुकाराम गाजरे, बापू नागटिळक, तानाजी पवार व इतर तीन ते चारजणांवर पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Comments are closed.