Pandharpur Darshan News – श्री विठ्ठल-श्री रुक्मिणी मातेच्या मूर्ती संवर्धनाचे काम पूर्ण, दर्शन मात्र 26 सप्टेंबरपासून

श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तींचे दीर्घकालीन जतन, संरक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI), छत्रपती संभाजीनगर व राज्य पुरातत्त्व विभाग, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या मूर्ती संवर्धनाचे काम आता पूर्णत्वास आले आहे. संवर्धनाची संपूर्ण प्रक्रिया शास्त्रोक्त व अत्यंत काळजीपूर्वक पद्धतीने करण्यात येत असून, मूर्तींचे प्राचीन सौंदर्य, धार्मिक पावित्र्य व परंपरा अबाधित ठेवण्यास विशेष प्राधान्य देण्यात आले असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी दिली.

दि. 22 सप्टेंबर रोजी रात्री श्रींचे दर्शन बंद झाल्यानंतर मूर्ती संवर्धनाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली होती. संवर्धन प्रक्रियेपूर्वी मूर्तींचे सविस्तर छायाचित्रण, व्हिडिओ शूटिंग तसेच डिजिटल दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, छत्रपती संभाजीनगरचे उपअधीक्षक डॉ. एस. विनोद कुमार यांनी सांगितले की, श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तींचे यापूर्वीही संवर्धन करण्यात आले आहे. सध्याच्या संवर्धन प्रक्रियेत मूर्तींची शास्त्रोक्त पद्धतीने पाहणी करून आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या असून श्री विठ्ठलाच्या मूर्तीचे संवर्धनाचे काम पूर्ण करण्यात येत आहे. संपूर्ण प्रक्रिया पुरातत्त्वीय निकष व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात येत आहे. मूर्ती संवर्धनाच्या प्रक्रियेत मूर्तींची आवश्यक विहित पद्धतीने स्वच्छता करण्यात आली असून, त्यानंतर निकषांनुसार आवश्यक संरक्षक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. संपूर्ण कामादरम्यान मूर्तींच्या मूळ स्वरूपाला कोणतीही बाधा येणार नाही, तसेच धार्मिक भावना, परंपरा व मंदिराचे पावित्र्य अबाधित राहील, याची विशेष दक्षता घेण्यात आली.

दरम्यान, मंदिर दर्शन तीन दिवस बंद असल्याच्या कालावधीचा उपयोग मंदिर जतन व संवर्धनाच्या अनुषंगाने करण्यात येत असून, श्री विठ्ठल गाभारा व श्री रुक्मिणी गाभारा परिसरातील दगडी वास्तूंच्या जतन व संवर्धनाचे कामही प्रगतीपथावर आहे. या कामामुळे मंदिर वास्तूच्या मूळ स्थापत्य वैशिष्ट्यांचे जतन होण्यास मदत होणार असून, संवर्धनानंतर मंदिर वास्तूचे मूळ स्वरूप अधिक उठून दिसण्यास सहाय्य होणार आहे. राज्य पुरातत्त्व विभाग, पुणेचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे यांनी सांगितले की, मूर्ती संवर्धनाच्या निमित्ताने मंदिर दर्शनासाठी बंद असलेल्या कालावधीत मंदिर जतन व संवर्धनाच्या अनुषंगाने आवश्यक असलेली दगडी वास्तूंची कामेही हाती घेण्यात आली आहेत. श्री विठ्ठल गाभारा व श्री रुक्मिणी गाभारा परिसरातील दगडी वास्तूंचे संवर्धनाचे काम सध्या प्रगतीपथावर असून, ही कामे पूर्ण झाल्यानंतर मंदिर वास्तूचे मूळ स्थापत्य स्वरूप अधिक स्पष्टपणे दिसून येणार आहे.

मूर्ती संवर्धन व मंदिर जतन संवर्धनाच्या कामादरम्यान मंदिराचे पावित्र्य, धार्मिक परंपरा व सुरक्षा यांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, राज्य पुरातत्त्व विभाग, मंदिर समितीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या समन्वयातून संपूर्ण प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आली. मूर्ती संवर्धनाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यात येत असून, दि. 26 सप्टेंबर पासून श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेचे दर्शन भाविकांसाठी पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी दिली.

Comments are closed.