चैत्री यात्रेसाठी पंढरीत भाविकांची मांदियाळी, दर्शनरांग पत्राशेडपर्यंत; आज एकादशीचा मुख्य सोहळा
चैत्री यात्रा कामदा एकादशीचा मुख्य सोहळा उद्या (दि. 29) लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत साजरा होत आहे. दशमी दिवशी सुमारे 2 लाखांहून अधिक भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली. दर्शनरांगेतही लाखावर भाविक उभे आहेत. दर्शनरांग पत्राशेडमध्ये पोहोचलेली आहे. उन्हाचा चटका असला, तरी दर्शनरांगेत त्याचबरोबर मंदिर परिसरात शेडनेटची सावली तयार करण्यात आल्यामुळे भाविकांना दिलासा मिळत आहे. अवकाळी पाऊस आणि वाढत्या तापमानामुळे भाविकांची संख्या घटली आहे. यातच शिखर शिंगणापूरचीदेखील यात्रा सुरू असल्याने भाविक श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन शिखर शिंगणापूरला जात असल्याने पंढरपूरची चैत्री वारी धावती वारी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे.
चैत्री शुद्ध एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य प्रकाश महाराज जवंजाळ यांच्या हस्ते, तर रुक्मिणी मातेची नित्यपूजा सदस्य संभाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात करण्यात येणार आहे. चैत्री यात्रा सोहळा पार पाडण्यासाठी सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक संदेश भोसले प्रयत्नशील आहेत. सध्या काढणी आणि सुगीचे दिवस आहेत. ऊन वाढत असून, अवकाळी पावसाची भीती आहे. असे असले तरी एकादशी दिवशी 5 लाख भाविक उपस्थित राहतील, असा अंदाज मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज देशमुख (जळगावकर) यांनी व्यक्त केला आहे.
चैत्री एकादशीला आलेले भाविक चंद्रभागा स्नान करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे कामदा एकादशी सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांनी चंद्रभागा वाळवंट फुलू लागले आहे. भाविक स्नानाचा आनंद घेत आहेत. स्नानानंतर ‘श्रीं’चे दर्शन घेण्यासाठी भाविक रांगेत उभे आहेत. दर्शनरांग पत्राशेडमध्ये तिसऱया शेडमध्ये पोहचली आहे. या दर्शनरांगेत एक लाखाहून अधिक भाविक दाखल झालेले आहेत.
दर्शनरांगेतील भाविकांसाठी दशमी, एकादशी व द्वादशीला लिंबू सरबत, तांदळाची, शाबूची खिचडी, पाणी आदींची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. ‘श्रीं’चा प्रसाद बुंदी लाडू प्रसादाची विक्री सुरू आहे. पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम सुरू आहे. आरोग्य विभागदेखील भाविकांच्या सेवेसाठी सज्ज आहे.
श्री विठ्ठलास पुरणपोळीचा नैवेद्य
– रविवारी (दि. 29) चैत्र शुद्ध एकादशीला उपवास आहे. असे असूनही विठूरायाला दुपारी पुरणपोळीचा महानैवेद्य दाखविण्यात येणार आहे. पुरणपोळीचा महानैवेद्य देण्याची शेकडो वर्षांची परंपरा आजही पाळली जात आहे. याची आख्यायिका देखील सांगितली जाते. ती म्हणजे भाविक चैत्री एकादशीला पंढरीत येऊन श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन शिखर शिंगणापूरला जातात. येथे शंकर पार्वतीचा विवाह सोहळा असतो. या विवाहाला साक्षात विठूरायाही गेले आणि लग्नात पंचपक्वानांचे भोजन केले, अशी आख्यायिका वारकरी संप्रदायात सांगितली जाते. म्हणून विठ्ठलास पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो, तर रुक्मिणीमातेला नेहमीचाच नैवेद्य दाखवण्यात येणार आहे.
चैत्री यात्रेवर उन्हाचे सावट
– चैत्री एकादशीचा मुख्य सोहळा उद्या (दि. 29) लाखो भाविकांच्या उपस्थित साजरा होत आहे. मात्र, वाढत्या उन्हाचा परिणाम यात्रेवर स्पष्ट दिसून येत आहे. दशमीला (शनिवारी) पंढरपूर शहर, भक्तिसागर, चंद्रभागा वाळवंट येथे भाविकांची तूरळक गर्दी दिसून येत होती. तर दर्शनरांगेत वॉटरप्रूफ दर्शन मंडप उभारल्याने सावली तयार झाली आहे. त्यामुळे दर्शनरांगेतच भाविकांची गर्दी दिसून येत आहे. मात्र, गतवर्षीच्या यात्रेच्या तुलनेत यंदा चैत्री यात्रेत भाविकांची संख्या घटली असल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्यात मागील आठवडय़ापासून तापमानात प्रचंड वाढ झालेली आहे. पंढरपूर येथील तापमान 40 अंश सेल्सिअस पार झाले आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दुपारी 12 नंतर सायंकाळी 5 वाजेपर्यंत नागरिक, भाविक घराबाहेर पडणे टाळत आहेत. त्यामुळे चैत्री यात्रेकडेदेखील भाविकांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे.
250 सीसीटीव्हींची करडी नजर
– भक्तिसागर 65 एकर येथेदेखील भाविक तंबू, राहुटय़ा उभारून भजन, कीर्तन व प्रवचनात दंग झालेले आहेत. मात्र, येथे यंदा कमी प्रमाणात भाविक दिसून येतात. भाविकांची वारी सुरक्षित पार पडावी म्हणून 1272 पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, दर्शनरांग, 65 एकर व शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी मंदिराचे व पोलीस स्टेशनचे मिळून 250 सीसीटीव्हींची करडी नजर ठेवण्यात येत आहे.
Comments are closed.