प्रवाशांमध्ये घबराट ‘मोनो’त शुकशुकाट

मोनोरेलच्या चेंबूर ते भक्तीपार्क स्थानकांदरम्यान मंगळवारी एक रेक झुकल्याची घटना घडल्यानंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली आहे. पुन्हा जीव टांगणीला नको, प्रवासाची ती लटपंती नको, अशी प्रतिक्रिया देत बुधवारी शेकडो नियमित प्रवाशांनी मोनोरेलकडे पाठ फिरवली. त्यातच नादुरुस्त रेक काही काळासाठी सेवेबाहेर गेल्याने अर्ध्या-अर्ध्या तासाने गाडय़ा धावल्या. त्यामुळे बहुतांश स्थानकांत दिवसभर शुकशुकाट होता.

दक्षिण मुंबईतील संत गाडगे महाराज चौक ते चेंबूरला जोडणाऱया मोनोरेलच्या सेवेला आधीपासून बिघाडाचे ग्रहण लागले आहे. मोनोरेलच्या जुन्या गाडय़ांमध्ये वारंवार बिघाड होऊन फेऱया रद्द होतात. याचा मनःस्ताप नियमित प्रवासी कित्येक महिने सहन करीत आहेत. अशा स्थितीत मंगळवारी मोनोरेलचा एक रेक मार्गिकेवरून खाली कोसळण्याच्या दिशेने झुकला. गाडीतील 400 हून अधिक प्रवासी सवा तास मदतीविना गाडीत अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी गाडीच्या काचा फोडून व्रेनच्या मदतीने प्रवाशांना बाहेर काढले. त्या घटनेने प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. त्याचा परिणाम बुधवारी दिसला. मोनोरेलच्या स्थानकांमध्ये शुकशुकाट होता. दिवसभरात मोजक्याच प्रवाशांनी मोनोरेलचा प्रवास केला. सध्या मोनोरेलच्या ताफ्यात सहा रेक आहेत. त्यातील मंगळवारी बिघडलेला रेक दुरुस्तीसाठी पाठवण्यात आला. त्यामुळे बुधवारी पाच रेकमध्ये दिवसभराची सेवा चालवण्यात आली.

महसूल मिळत नसल्याने सरकारची डोळेझाक

मोनोरेलच्या 17 स्थानकांची संपूर्ण मार्गिका 4 मार्च 2019 रोजी प्रवासीसेवेसाठी खुली केली. त्यानंतरही मोनोरेल सेवेतून चांगला महसूल मिळत नसल्याने मिंधेंच्या ताब्यातील एमएमआरडीएने मोनोरेलच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत आहे. मार्गिकेवरील मोनोरेलच्या जुन्या गाडय़ा सेवेतून हटवून नव्या गाडय़ा आणण्यात सरकार अपयशी ठरल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करीत आहेत.

आपली ‘लोकल’च बरी

मंगळवारच्या घटनेने मोनोरेलच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुरक्षेच्या चिंतेने बुधवारी मोनोचे शेकडो नियमित प्रवासी लोकल ट्रेनच्या प्रवासाकडे वळले. आधीच मोनोरेलच्या फेऱया 18 ते 20 मिनिटांनी येतात. त्यात रेक कमी झाल्याने वेळापत्रकाचा भरवसा नाही. सुरक्षेबाबतही धाकधूक वाढली आहे, अशी प्रतिक्रिया चेंबूर येथील दिनेश सकपाळ यांनी दिली. त्यांनी चेंबूरहून लोकल ट्रेनने करी रोड गाठले.

Comments are closed.