संचमान्यतेमुळे राज्यातील 884 शाळा बंद पडणार, शिक्षण राज्यमंत्र्यांची कबुली

शिक्षण विभागाने संचमान्यतेचा निर्णय घेतल्यानंतर त्याचा फटका राज्यभरातील अनेक शाळांना बसला असून राज्यातील 884 शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असून त्याचा फटका कोकणातील 99 शाळांनाही बसणार असल्याची कबुली शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिली. यावर उपाययोजना शोधण्यासाठी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या आमदारांबरोबर बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
राज्यात संचमान्यतेनुसार जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षक आणि मुख्याध्यापकांची पदे निश्चित होतात. त्यानुसार 2024-25 या वर्षाच्या संच मान्यतेचे निकष शिक्षण विभागाने जाहीर केले आहेत. पुणे विभागातील माध्यमिक शाळेतील अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अद्याप शालार्थ आयडी मिळालेले नाहीत. अनुदानित माध्यमिक शाळांपैकी 884 शाळांना 2024-25 च्या संचमान्यतेमध्ये एकाही शिक्षकाचे पद मंजूर करण्यात आलेले नाही, असे जयंत आसगावकर यांनी परिषदेच्या निदर्शनाला आणून दिले. ज. मो. अभ्यंकर, भाई जगताप, परिणय फुके, प्रवीण दरेकर, ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यासह अनेक सदस्यांनी चर्चेत भाग घेतला.
z शालान्त परीक्षेत कित्येक वर्षे कोकणातील शाळांचा रिझल्ट पहिल्या श्रेणीचा लागत आहे. मात्र संच मान्यतेमुळे कोकणातील शाळांचे आणि मुलांचे भवितव्य धोक्यात आले आहे. सुमारे 99 शाळांना याचा फटका बसला आहे. त्यामुळे संच मान्यतेत दुरुस्ती होणे आवश्यक आहे, अशी माहिती निरंजन डावखरे यांनी दिली.
Comments are closed.