पंकज चौधरी यांची उत्तर प्रदेश भाजप अध्यक्षपदी नियुक्ती.
विनोद तावडे अन् पियूष गोयलांकडून घोषणा : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राहिले उपस्थित
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तरप्रदेश भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळाला आहे. केंद्रीय पर्यवेक्षकांनी पंकज चौधरी यांच्या नावाची घोषण या पदाकरता रविवारी केली. तर शनिवारी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने यापूर्वीच त्यांचे नाव निश्चित झाल होते. पंकज चौधरींच्या नियुक्तीला भाजपची मोठी राजकीय खेळी मानली जातेय. चौधरी हे पूर्वांचलच्या महाराजगंज येथुन सातवेळा खासदार म्हणून निवडून आले असून कुर्मी समुदायाशी संबंधित आहेत. उत्तरप्रदेश खासकरून पूर्वांचलमध्ये ओबीसी लोकसंख्या एक मोठी मतपेढी आहे. पंकज चौधरींसारख्या मातब्बर कुर्मी नेत्याला धुरा सोपवून भाजप समाजवादी पक्षाच्या पीडीए (मागास, दलित, अल्पसंख्याक) समीकरणाला मोडीत काढू पाहत आहे.
पंकज चौधरी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. केंद्रीय अर्थराज्यमंत्री म्हणून त्यांचा अनुभव आणि संघटनात्मक क्षमताही या निवडीचे प्रमुख कारण आहे. पंकज चौधरींसमोर आता अनेक महत्त्वपूर्ण आव्हाने असतील, ज्यात पक्ष कार्यकर्त्यांना एकजूट ठेवणे, आगामी निवडणुकांसाठी रणनीति तयार करणे आणि केंद्र तसेच राज्य सरकारच्या धोरणांना लोकांपर्यंत पेहोचविणे सामील आहे.
भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, प्रदेश अध्यक्ष निवडणुकीचे केंद्रीय प्रभारी, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, माजी केंद्रीय मंत्री डॉ. महेंद्र नाथ पांडे यांनी पंकज चौधरी यांच्या विजयाची घोषणा केली आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते.
कुर्मी नेत्याला संधी
चौधरी हे कुर्मी समुदायाशी संबंधित आहेत. यापूर्वी या समुदायाचे नेते विनय कटियार, ओम प्रकाश सिंह आणि स्वतंत्रदेव सिंह प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. पंकज चौधरी हे आतापर्यंत सातवेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत.
गोरखपूर ठरले सत्तेचे केंद्र
परतलेले पंकज चौधरी हे प्रदेशाध्यक्ष झाल्याने भाजपच्या राजकारणात पूर्वांचलचा प्रभाव अधोरेखित होणार आहे. खासकरून गोरखपूर क्षेत्र सत्तेचे नवे केंद्र म्हणून उदयास आले आहे. गोरखपूरच्या राजकारणात योगी आदित्यनाथ आणि पंकज चौधरी हे भाजपचे दोन दिग्गज नेते असुन यातील एकाकडे सरकार तर दुसऱ्याकडे भाजप संघटनेची धुरा आली आहे.
Comments are closed.