Pankaja Munde on Beed Gaurdian ministership to ajit pawar ncp
मुंबई : नुकतेच राज्य सरकारने पालकमंत्रिपदाची यादी जाहीर केली. यामध्ये बीडचे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आले. सरकारने यादी जाहीर करताच महायुतीमध्ये धुसपूस सुरू असल्याचे समोर आले आहे. एकीकडे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली. तर, आता सोमवारी (20 जानेवारी) प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडचे पालकमंत्रिपद न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. “मी बीडची लेक आहे. बरेच वर्ष मी बीडमध्ये काम केले आहे. मला बीडचे पालकत्व मिळाले असते तर आनंदच झाला असता.” अशी नाराजी त्यांनी बोलून दाखवली. त्यामुळे आता अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. (Pankaja Munde on Beed Gaurdian ministership to ajit pawar ncp)
हेही वाचा : CM Fadnavis : फडणवीस सरकारचा सावळा गोंधळ, रायगड अन् नाशिक पालकमंत्री नियुक्तीस स्थगिती
सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, “जालना जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळालेले आहे. मला चांगला प्रतिसाद मिळत असून बरेच लोकं उत्साहात आहेत. मला मिळाली संधी ही मी एक अनुभव म्हणून घेत असते. प्रत्येकवेळी तुम्हाला सारखेच काम करायला मिळते, असे होत नाही. 5 वर्षे मी कोणत्याही पदावर नसताना पूर्णतः संघटनेचे काम केले. मी बीडची लेक आहे, मला बीडची सेवा करण्याची संधी मिळाली असती तर अजून आनंद झाला असता. बीडकरांनाही खूप आनंद झाला असता.” असे म्हणत त्यांनी आपली खदखद बोलून दाखवली.
मंत्री पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, “माझ्या 5 वर्षातील कार्यकाळ हा सगळ्यात जास्त विकसनशील असा कार्यकाळ राहिलेला आहे. हा कोणत्याही विचाराचा व्यक्ती मान्य करेल. पण आता जो निर्णय घेण्यात आला, त्या निर्णयाबद्दल कोणतीही असहमती न दर्शवता आपल्याला जे मिळाले आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त चांगले काम करण्याच्या भूमिकेमध्ये मी आहे. तसेच, जालना जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मी आनंदी आहे. पण आता मला जालना आणि बीड असे दोन्हीकडे लक्ष द्यावे लागेल. पालकमंत्री अजित पवार आहेतच, पण इतकी वर्षे मी तिथे काढल्यामुळे अजितदादा आम्हाला तिथे पूर्ण सहकार्य करतील असा विश्वास आहे.” त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे आता अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहेत.
धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या नावाला विरोध?
सध्या राज्यात बीडमधील मस्साजोग येथील झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. अशामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारा वाल्मिक कराड याच्यावर हत्या आणि खंडणीप्रकरणी अनेक आरोप आहेत. हे प्रकरण गेल्या काही महिन्यापासून गाजत असताना बीडचे पालकमंत्रिपद हे धनंजय मुंडे आणि भाजपच्या मंत्री तसेच त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांच्याकडे देऊ नये, अशी मागणी बीडच्या सर्वपक्षीय नेत्यांची होती. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेल्या पालकमंत्रिपदाच्या यादीत धनंजय मुंडे यांना डच्चू दिला. तर अजित पवार यांच्याकडे बीडचे पालकमंत्रिपद सोपविण्यात आले. तसेच, मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे जालना जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
Comments are closed.