आपुल्याच खड्ड्यात आपुलीच गाडी रुतली; पनवेल महापालिकेच्या निकृष्ट रस्ते कामाचा पंचनामा
पनवेल शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे, उखडून पसरलेली खडी याचा रोजचा मनस्ताप नागरिक भोगत असले तरी त्याचा फटका खुद्द पनवेल पालिकेलाही बसला. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे खड्डे भरले न गेल्याने याच एका मोठ्या खड्ड्यात महापालिकेची सिव्हरेज व्हॅनच अडकून बसली. या व्हॅनची दोन्ही चाके अक्षरशः बॉडीपर्यंत रुतल्याने ती बाहेर काढताना नाकीनऊ आले. या घटनेमुळे पनवेल महापालिकेच्या कारभाराचा पंचनामाच झाला असून रस्ते कामाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पावसाळ्यापूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आल्याचा दावा महापालिकेने केला होता. परंतु पावसाळा सुरू होताच बुजवलेले अनेक खड्डे उघडे पडले आणि नव्या रस्त्यांवरही खड्डे पडले. कामोठे सेक्टर २०मध्ये विविध कामांसाठी खड्डे खोदण्यात आले. मात्र कामे पूर्ण झाल्यानंतर हे खड्डे योग्य पद्धतीने न बुजवल्याने नागरिकांना रोजच त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यासाठी महापालिकेकडे तक्रारी करूनही उपयोग झाला नाही.
महापालिकेच्या गाडीची ही स्थिती तर सर्वसामान्यांच्या गाड्यांचे काय?
महापालिकेची सिव्हरेज व्हॅन याच मार्गावरून गेली आणि ती एका मोठ्या खड्ड्यात अडकली. हा खड्डा इतका खोल होता की वाहनाची पुढील चाके खोलवर रुतली. त्यामुळे ही व्हॅन बाहेर काढण्यासाठी खूपच यातायात करावी लागली. पालिकेच्या वाहनाचीच अशी अवस्था होत असेल तर सर्वसामान्यांच्या छोट्या गाड्यांच्या सुरक्षिततेचे काय, असा सवाल कामोठेवासीयांनी व्यक्त केला. शिवसेनेचे सुनील गोवारी यांनी या रस्त्याच्या कामाची पाहणी आणि गुणवत्ता तपासणीची मागणी केली आहे.
Comments are closed.