सुवर्णशक्तीचा झंकार; पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये विनयने उचलले सोनेरी वजन

हिंदुस्थानचा पॅरा पॉवरलिफ्टिर विनयने इजिप्तमधील काहिरा येथे सुरू असलेल्या पॅरा पॉवरलिफ्टिंग जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णयशाची नवी गाथा रचली. दुसऱ्या दिवशी झालेल्या 72 किलो ज्युनियर प्रकारात त्याने दमदार कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले. विनयने आपल्या तीन प्रयत्नांमध्ये अनुक्रमे 137 किलो, 142 किलो आणि 147 किलो वजन उचलत सोन्यावर आपला दावा केला. त्याची अंतिम फेरीतील 147 किलो उचलण्याचा यशस्वी प्रयत्न पंचांनी अवैध ठरवला, मात्र दुसऱ्या प्रयत्नातील 142 किलोचे यश सुवर्णपदक निश्चित करण्यासाठी पुरेसे ठरले. इक्वेडोरच्या सॅबेस्टियनने 137 किलो वजन उचलून कांस्यपदक जिंकले.
विनयने यापूर्वीही दमदार कामगिरी करत इजिप्तमधील शर्म-अल-शेख येथे झालेल्या पॅरा पॉवरलिफ्टिंग वर्ल्ड कपमध्ये 59 किलो ज्युनियर प्रकारात 120 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले होते.
या यशानंतर भावूक होत विनय म्हणाला, ‘हे पदक फक्त माझे नाही. माझ्याकडे काहीच नसताना माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचे हे पदक आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळेच हे स्वप्न साकार झाले.’ हिंदुस्थान संघाचे प्रशिक्षक जे. पी. सिंग यांनी सांगितले, ‘विनयचा विजय हा कठोर परिश्रम, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या यशाचे प्रतिबिंब आहे. योग्य मार्गदर्शन आणि आधार मिळाला तर आपल्या पॅरा खेळाडूंना कोणतेही जागतिक व्यासपीठ गाठता येते, हे विनयने सिद्ध केले आहे. विनयचे हे सुवर्णपदक केवळ हिंदुस्थानासाठी अभिमानाची बाब नसून येत्या पॅरालिम्पिक 2028 साठी पात्रतेच्या दिशेने एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
Comments are closed.