क्वालिटी टेस्टमध्ये पॅरासिटामॉल आणि बीपीचे औषध फेल; नागपूरच्या सरकारी रुग्णालयांमध्ये वापरावर बंदी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

क्वालिटी टेस्टमध्ये पॅरासिटामॉल आणि बीपीचे औषध फेल ठरल्याने नागपूरच्या सरकारी रुग्णालयांमध्ये यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) गुणवत्ता चाचणीत ही औषधे अयशस्वी ठरली आहेत. यानंतर सरकारी रुग्णालयांनी या औषधांचा साठा परत मागवला आहे. ही औषधे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (GMCH) आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला पुरवण्यात आली होती.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, एफडीएने नियमित तपासणीदरम्यान पॅरासिटामॉल आणि टेल्मिसार्टनचे नमुने गोळा केले होते. या नमुन्यांच्या चाचणीनंतर एफडीएने बाधित साठ्याचे वितरण करण्याचे आणि तो परत मागवण्याचे आदेश दिले. ही दोन्ही औषधे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी वापरली जातात. मिळालेल्या माहितीनुसार, ही औषधे इंदूरस्थित एका औषध कंपनीने तयार केली होती.

एफडीएकडून सूचना मिळाल्यानंतर रुग्णालयाने अंदाजे 1.25 लाख पॅरासिटामॉल गोळ्या परत मागवल्या आहेत. या गोळ्या जुलै महिन्यात पुरवण्यात आल्या होत्या आणि चाचणीचे निकाल मिळाल्यानंतर रुग्णालयाने रुग्णांना त्या देणे बंद केले आहे. या पॅरासिटामॉल गोळ्या ‘पॅरासेव 500’ या ब्रँड नावाने विकल्या गेल्या होत्या. ही औषधे गुणवत्ता मानकांची पूर्तता करू न शकल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून उर्वरित साठा परत मागवण्यात आला.

टेल्मिसार्टन 40 मिग्रॅ हे सामान्यतः उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी दिले जाते. गोळीवर दिसणाऱ्या डागांव्यतिरिक्त, हे औषध विरघळण्याच्या चाचणीतही अयशस्वी ठरले. यानंतर रुग्णालयांना वितरण थांबवण्याचे आणि वॉर्ड व फार्मसीमधून उपलब्ध असलेला साठा परत मागवण्याचे निर्देश देण्यात आले होते. ही औषधे बनावट नसली तरी, ती निकृष्ट दर्जाची असल्याचे आढळून आले आहे.

Comments are closed.