ऐतिहासिक क्षण! रणजी ट्रॉफीच्या 92 वर्षाच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदाच, पारस डोग्राने केली वसीम जाफरची बरोबरी

भारतीय क्रिकेटमधील मानाची स्पर्धा रणजी ट्रॉफी. या स्पर्धेचे २०२५-२६ हंगामाचे उपांत्य फेरीचे सामने सुरू आहेत. त्यामधील दुसरा उपांत्य सामना जम्मू-काश्मिर आणि बंगाल यांच्यात खेळला जात आहे. कालयानीच्या बंगाल क्रिकेट ग्राऊंडवर सुरू असलेल्या या सामन्यात सोमवारी (१६ फेब्रुवारी) इतिहास रचला गेला. जम्मू-काश्मिरचा कर्णधाराने दिग्गज वसीम जाफरची बरोबरी केली आहे.
या स्पर्धेच्या इतिहासात दहा हजार धावा करण्याचा विक्रम जाफर यांच्या नावावर आहे. आता जम्मू-काश्मिरचा पारस डोग्रा (Paras Dogra) रणजी ट्रॉफीमध्ये दहा हजार धावा करणारा केवळ दुसराच फलंदाज ठरला आहे. त्याने ही कामगिरी बंगालविरुद्धच्या सामन्यात केली.
या सामन्यात जम्मू-काश्मिरने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे बंगालने पहिल्या डावात ३२८ धावासंख्या केली. जम्मू-काश्मिरच्या पहिल्या डावाची सुरूवात निराशाजनक झाली. त्यांनी १३ धावांवरच दोन विकेट्स गमावल्या. डोगरा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. तेव्हा त्याने ११वी धाव घेताच हा विक्रम केला.
रणजी ट्रॉफीच्या ९२ वर्षांत १० हजार धावा करणारा पारस केवळ दुसराच फलंदाज ठरला आहे. त्याने १४७ सामन्यांमध्ये ही कामगिरी केली. रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम जाफर यांच्या नावावर आहे. त्यांनी १२०३८ धावा केल्या आहेत.
पारसने २००१मध्ये हिमाचल प्रदेशकडून कारकिर्दीतील पहिला प्रथम श्रेणीचा सामना खेळला होता. त्यामध्ये त्याने ९५ रणजी ट्रॉफीचे सामने खेळले होते. त्यात १९ शतक आणि २४ अर्धशतकांसह ६४१८धावा केल्या. त्यानंतर तो २०१८मध्ये पुड्डुचेरीला गेला. तेव्हा त्याने पुड्डुचेरीकडून पहिल्या रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना शतक केले होते. त्याने पाच हंगामात ११ शतके केली. २०२४-२५च्या हंगामाआधी तो जम्मू-काश्मिरला गेला आणि संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी घेतली. या हंगामात त्याने ५००पर्यंत धावा केल्या असून जम्मू-काश्मिरकडून सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर त्याच्या नेतृत्वात संघाने या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठली आहे.
रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक शतके जाफर यांच्याच नावावर आहे. त्यांनी ४० शतके केली आहे. दुसरीकडे पारस दुसऱ्या स्थानावर असून त्याने ३३ शतके केली आहेत. तसेच सध्या पारस १४७वा सामना खेळत असून तो जाफरनंतर (१५६) सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे.
Comments are closed.