परभणी: पत्नीच्या थकीत वेतनासाठी १.८० लाखांची लाच; एका फोन कॉलने पर्दाफाश, लिपिकासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

परभणी जिल्हा परिषदेत लाचखोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीचे १२ लाख ४६ हजार ४९८ रुपयांचे थकीत वेतन मंजूर झाल्यानंतर ही रक्कम अदा करण्यासाठी १५ टक्के कमिशनच्या स्वरूपात १ लाख ८० हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. ही रक्कम स्वीकारताना जिल्हा परिषद समाजकल्याण विभागातील कर्मचारी शेख असलम शेख रझ्झाक याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले. या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी असलेले जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोंशीकर यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. एका फोन कॉलमुळे या संपूर्ण लाचखोरीच्या प्रकरणाचा पर्दाफाश झाला.

या प्रकरणातील तक्रारदार ६५ वर्षांचे असून, त्यांच्या पत्नीने ३० ऑक्टोबर २०२४ रोजी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यांच्या पत्नीचे एप्रिल २०२१ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीतील १२ लाख ४६ हजार ४९८ रुपयांचे थकीत वेतन मंजूर झाले होते. मात्र, ही रक्कम अदा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील कर्मचाऱ्याने थकीत वेतनाच्या १५ टक्के रकमेची मागणी केली होती. यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोंशीकर यांच्याकडे समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त पदाचाही अतिरिक्त कार्यभार आहे. त्यांच्या नियंत्रणाखाली जिंतूर येथील किशनराव वसेकर निवासी अस्थिव्यंग विद्यालयातील कलाशिक्षक शेख असलम शेख रझ्झाक हे प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. तक्रारीनंतर एसीबीच्या पथकाने मोबाईलवरील संभाषणाच्या आधारे लाच मागणीची पडताळणी केली. त्यावेळी शेख असलम याने थकीत वेतनाच्या १५ टक्क्यांप्रमाणे १ लाख ८० हजार रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर परभणी बसस्थानकाजवळील मिलन ऑप्टिकल्ससमोर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे शेख असलम याने तक्रारदाराकडून १ लाख ८० हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. पुढील कारवाईसाठी त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात आणण्यात आले.

कार्यालयात पंचांसमक्ष चौकशी केली असता, आपण ही रक्कम वरिष्ठ अधिकारी डॉ. संदीप घोंशीकर यांच्यासाठी स्वीकारल्याचे शेख असलम याने सांगितले. त्यानंतर त्याने घोंशीकर यांना मोबाईलवर फोन करून लाचेची रक्कम स्वीकारल्याची माहिती दिली. तसेच, ही रक्कम कुठे आणून द्यायची, अशी विचारणाही केली. त्यावर घोंशीकर यांनी पैसे घरी आणून देण्यास सांगितल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले.

या फोन कॉलमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा या प्रकरणातील सहभाग समोर आला. त्यानंतर एसीबीच्या पथकाने जिल्हा परिषद कार्यालयातून डॉ. संदीप घोंशीकर यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी पुढील कारवाई सुरू असून, या कारवाईमुळे परभणी जिल्हा परिषद प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

Comments are closed.