सोमवारी येत 'परीक्षा पे चाचा'

पंतप्रधानांसह दीपिका पदुकोण, मेरी कोम या सेलिब्रिटींचाही सहभाग

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सर्वात लोकप्रिय कार्यक्रम ‘परीक्षा पे चर्चा-2025’ची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हा ‘परीक्षा पे चर्चा’ (पीपीसी) कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 10 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कोम, अवनी लेखरा आणि आध्यात्मिक गुरू सद्गुरु हेदेखील ‘पीपीसी’च्या आठव्या आवृत्तीत सहभागी होतील. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना ताणतणाव व्यवस्थापित करण्याचे तंत्र आणि जीवनातील आव्हानांना तोंड देण्याचे कौशल्य याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.

भारत सरकार दरवर्षी ‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम आयोजित करते. या कार्यक्रमात देशभरातील सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांसह आणि मुलांच्या पालकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद साधण्याची संधी मिळते. यावर्षी निवडलेल्या 2,500 विद्यार्थ्यांना पीपीसी 2025 मध्ये लाईव्ह जाण्याची संधी मिळेल. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. तथापि, यावेळी देशातील काही प्रसिद्ध व्यक्तीदेखील या कार्यक्रमात सहभागी होतील. यामध्ये मेरी कोम, दीपिका पदुकोण आणि सद्गुरू यांची नावे आहेत. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षांचा ताण कमी करण्यासाठी विविध टिप्स आणि युक्त्या देतात. हा कार्यक्रम सीबीएसई बोर्ड परीक्षा सुरू होण्यापूर्वी आयोजित केला जातो.

दीपिका पदुकोण मानसिक आरोग्याबद्दल बोलणार

यावर्षी हा कार्यक्रम खूप खास असणार आहे कारण या कार्यक्रमादरम्यान सद्गुरु, दीपिका पदुकोण, मेरी कोम आणि अवनी लेखरा यांचे रेकॉर्ड केलेले व्हिडिओ दाखवले जातील. पीपीसी 2025 कार्यक्रमात आध्यात्मिक गुरू सद्गुरु ताण व्यवस्थापन आणि सजगतेवर अंतर्दृष्टी सामायिक करतील. त्याचवेळी, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण मुलांना मानसिक आरोग्याचे महत्त्व सांगेल. मेरी कोम आणि क्रीडा विजेती अवनी लेखरा देखील पीपीसी 2025 मध्ये सहभागी होतील. आठ वेळा जागतिक बॉक्सिंग चॅम्पियन राहिलेली मेरी कोम आणि भारतीय पॅरालिम्पिक नेमबाजी पद्मश्री पुरस्कार विजेती अवनी लेखरा आपल्या चिकाटी आणि आव्हानांवर मात करण्याचा अनुभव शेअर करतील.

Comments are closed.