संसद अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली आहे.
हिवाळी अधिवेशन समाप्त, लोकसभेत 111 टक्के काम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची समाप्ती झाल्यामुळे संसद अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आली आहे. या अधिवेशनात लोकसभेने कामकाजाचा विक्रम केला असून एकंदर या सदनाने 111 टक्के काम केले असल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यसभेतही मोठ्या प्रमाणात काम झाले. मात्र, दिल्लीच्या वायुप्रदूषणासंबंधात चर्चा दोन्ही सभागृहांमध्ये होऊ शकली नाही. या अधिवेशनाचे प्रथम दोन दिवस वाया जाऊनही कामकाज मोठ्या प्रमाणात झाले.
अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी, म्हणजे शुक्रवारी दोन्ही सभागृहांमध्ये दिल्लीतील वायुप्रदूषणावर चर्चा होणार होती. चर्चेला प्रारंभही झाला होता. तथापि, प्रचंड गोंधळ आणि गदारोळामुळे चर्चा पूर्ण होऊ शकली नाही. चर्चेत अनेकदा व्यत्यय आल्याने लोकसभेचे कामकाज 3 वेळा स्थगित करावे लागले. अखेरीस, सभागृहातील ‘वातावरण’ योग्य नसल्याने ते संस्थगित करण्यात येत आहे, अशी घोषणा लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्वपक्षीय सहमतीनुसार केली. राज्यसभेतही लोकसभेचीच पुनरावृत्ती झाल्याने तेथेही कामकाज संपविण्यात आले.
विरोधकांची घोषणाबाजी
दिल्ली आणि उत्तर भारतातील वायुप्रदूषणासंबंधी चर्चा झाल्यानंतर केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्रसिंग यादव हे या चर्चेला लोकसभेत संध्याकाळी 6 वाजता उत्तर देणार होते. तथापि, कामकाजाचा प्रारंभ झाल्यानंतर प्रथम प्रहरातच विरोधकांनी प्रचंड गदारोळ आणि घोषणाबाजी करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज तीन वेळा अल्पकाळासाठी स्थगित करण्यात आले. मात्र, नंतरही गोंधळ आणि आरडाओरडा न थांबल्याने अधिवेशन संपविण्यात आले आहे.
आता अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे वेध
यापुढे संसद अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी पुन्हा कामकाजाला प्रारंभ करणार आहे. यावेळी 1 फेब्रुवारीला रविवार असूनही त्याच दिवशी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. रविवारी अर्थसंकल्प सादर करण्याचा हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील प्रथम प्रसंग ठरण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातील प्रदूषणावर त्याच अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
बैठक अध्यक्षांनी घेतली
अधिवेशन स्थगित करण्याच्या आधी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक आयोजित केली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधारी पक्षाचे महत्वाचे नेते उपस्थित होते. काँग्रेस खासदार प्रियांका गांधी याही उपस्थित होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रियांका गांधी यांच्यात हास्यविनोद होत असल्याचेही दृष्य या बैठकीत पहावयास मिळाले. बैठकीत अधिवेशन समाप्त करण्यासंबंधी सहमती झाली. चहापानानंतर ही बैठक संपली. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभा अनिश्चित काळासाठी संस्थगित केली.
लोकसभेत 111 टक्के काम
18 व्या लोकसभेच्या या 6 व्या अधिवेशनात कामकाजाचा विक्रम झाला आहे. 1 डिसेंबरला प्रारंभ झालेल्या या अधिवेशनात लोकसभेत 111 टक्के कामकाज झाले. लोकसभेच्या एकंदर 15 बैठका झाल्या. एकंदर कामकाज 92 तास 25 मिनिटे झाले. या अधिवेशनात लोकसभेत सरकारच्या वतीने 10 विधेयके सादर करण्यात आली. त्यांच्यापैकी 8 संमत करण्यात आली. मणिपूर वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक 2025, केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयक 2025, आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा अधिभार विधेयक 2025, पुरवणी मागण्या विधेयक 2025, निष्कासन आणि सुधारणा विधेयक 2025, सबका बीमा सबकी रक्षा सुधारणा विधेयक 2025, अणुशक्तीसंबंधीचे ‘शांती’ विधेयक 2025 आणि ग्रामीण रोजगाराचे ‘जी राम जी’ विधेयक ही विधेयके लोकसभेत संमत झाली.
दोन ऐतिहासिक चर्चा
‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगानाला 150 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे या गीतावर लोकसभेत आणि राज्यसभेत वादळी चर्चा झाली. ती दोन्ही सभागृहांमध्ये प्रत्येकी 10 तासांहून अधिक काळ चालली. तसेच ‘निवडणूक सुधारणा’ या विषयावरही अशीच घमासान चर्चा झाली. तीही प्रत्येक सभागृहात 10 तासांहून अधिक चालली. निवडणूक सुधारणेसंबंधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेले उत्तर प्रचंड गाजले. त्यांनी विरोधकांचा प्रत्येक आक्षेप आणि प्रश्नाला सडेतोड उत्तर दिले.
कामकाजासाठी सरस अधिवेशन
ड लोकसभा आणि राज्यसभेत झाले अपेक्षेपेक्षाही अधिक प्रमाणात कामकाज
ड लोकसभेत केंद्र सरकारच्या आठ विधेयकांना मंजुरी, राज्यसभेतही संमती
ड नवी रोजगार हमी, अणुशक्ती सुधारणा, विमा खासगीकरण विधेयके संमत
ड आता वेध अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे, 1 फेब्रुवारीला मांडणार अर्थसंकल्प
Comments are closed.