राणे थोरल्या मुलाच्या पुर्नवसनासाठी शिंदेंना किती वेळा भेटले? परशुराम उपरकर यांचा टोला

शिंदे गटात कोणालाही प्रवेश द्यायचा असेल तर, माझी परवानगी लागेल, असे वक्त‌व्य नारायण राणे यांनी केले आहे. त्यामुळे नारायण राणे शिंदे गटाचे संपर्कप्रमुख आहेत की, भाजपचे खासदार आहेत? असा गैरसमज निर्माण होत आहे. वैभव नाईक असतील किंवा आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री असताना भेटलो, ती भेट विधायक कामांसाठी होती. परंतु नारायण राणे भाजपचे खासदार असून एकनाथ शिंदेंना 100 वेळा भेटत होते, ते कशासाठी? शिंदे गटात प्रवेश देण्यासाठी राणे संपर्क प्रमुख आहेत का? थोरल्या मुलाच्या पुर्नवसनासाठी शिंदेंना ते किती वेळा भेटले? हे जनतेसमोर राणेंनी जाहीर करावे, असे आव्हान माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिल आहे. तसेच करंजे येथे गोशाळा चालू करण्यापूर्वी राणेंनी यापूर्वी आणलेल्या दूध डेअरीकडून शेतकऱ्यांचे अडीच कोटी रुपये येणे बाकी आहेत, ते पालकमंत्री केव्हा देणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

कणकवली येथील आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते, ते म्हणाले की, 2005 च्या पोट निवडणुकीमध्ये नारायण राणेंना पाडण्यासाठी 100 लोक घेऊन त्यावेळी ठाण्यातून एकनाथ शिंदे व कार्यकर्ते जिल्ह्यात आले होते, हे राणेंनी विसरू नये. ज्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षातून हाकलपट्टी केली, त्यावेळी काँग्रेस नेत्या प्रभा राव व कॉंग्रेस नेत्यांना राणे भेटत होते, त्याच बरोबर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना नारायण राणे अनेकदा भेटले. तसेच गुजरातला कोणाकोणाला भेटायला ते जात होते? राणेंनी पक्षांतर केले ते स्वत:च्या स्वार्थासाठी केला, असा आरोप परशुराम उपरकर यांनी केला.

ज्यावेळी मनीलॉंड्रींगची केस त्यांच्यावर झाली, त्यावेळी राणेंनी भाजप प्रवेशासाठी काय काय केले? हे आम्हाला माहित आहे. स्वत:च्या दोन नंबरच्या मुलाचा भाजप प्रवेश होताना राणेंना किती वेळ बसस्थानकावर फडणवीसांनी थांबवून ठेवले होते, त्यानंतर तो प्रवेश भाजप माजी आ. प्रमोद जठार यांच्या हस्ते झाला होता, हे राणेंनी विसरू नये. शिंदे गटातील संपर्कमंत्री तथा पक्षातील 2 नंबरचे मंत्री पदावर असलेले नेते उदय सामंत यांना कोणाला पक्षात घ्यायचे? याचा अधिकार नसेल तर, सामंतांसोबत शिंदे गटात गेलेल्या कार्यकर्त्यांवर विचार करण्याची वेळ आली आहे, असे परशुराम उपकर म्हणाले आहेत.

राणेंनी काही वर्षापूर्वी जिल्ह्यात एक डेअरी आणली होती, त्या दूध डेअरीने शेतकऱ्यांकडून दूध घेवून अडीच कोटी रुपये अद्यापही शेतकऱ्यांना दिलेले नाहीत. हे शेतकऱ्यांचे पैसे वसुल करुन देण्याची जबाबदारी पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली होती. त्यांनी गोशाळा होण्यापूर्वी या शेतकऱ्यांना पैसे देवून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी परशुराम उपरकर यांनी केली आहे.

Comments are closed.