पार्थ पवारांचा ‘जिजाई’ बंगला पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, निवासी बंगल्यात कंपनी कशी?


पार्थ पवार जमीन घोटाळा पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)  यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी निमित्त आहे ते त्यांच्या ‘अमेडिया’ कंपनी आणि ‘जिजाई’ बंगल्याचं. पुण्यातील मुंढवा येथील वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणात (Parth Pawar Land Scam Pune) पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचा नोंदणीकृत पत्ता हा अजित पवारांचे निवासस्थान असलेल्या ‘जिजाई’ बंगल्याचा देण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

दरम्यान, आता प्रश्न असा उपस्थित केला जात आहे की, ‘पार्थ पवार यांनी अमेडिया कंपनीचे कार्यालय निवासी बंगल्यात सुरू केले असल्यास, त्यांनी महापालिकेला मिळकत कर व्यावसायिक दराने भरला आहे का?’ या प्रकरणाची आता चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हा बंगला मूळ बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांचा असून अजित पवार तिथे भाडेतत्त्वावर राहतात. विशेष म्हणजे, यापूर्वी आदर्श घोटाळ्यातही याच बंगल्याचा पत्ता वापरण्यात आल्याने ‘जिजाई’ बंगला पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आला आहे.

Parth Pawar Land Scam: पार्थ पवारांचा जिजाई बंगला वादाच्या भोवऱ्यात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ (Parth Pawar) पवार यांच्या अमेडिया कंपनीकडून 1,800 कोटींचे बाजारभाव असणारी जमीन केवळ 300 कोटींमध्ये खरेदी करण्यात आली. या खरेदी व्यवहारात शासनाची 152 कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे खरेदी व्यवहारात केवळ 500 रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले आहे. यात सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांना निलंबित करण्यात आले आहे. यावरून राजकीय राळ उठली असून, अजित पवार (Ajit Pawar) यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्ष करत आहेत. तर दुसरीकडे या जमिन खरेदी प्रकरणात पार्थ पवार (Parth Pawar) याचे मामेभाऊ आणि व्यावसायिक भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Ajit Pawar : अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी

दरम्यान, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण समोर आल्यानंतर विरोधकांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अंबादास दानवे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की, मुलगा पुण्यात 300 कोटींचा व्यवहार करतो, हे पित्याला ज्ञात नाही आणि जेव्हा या मुलाचे वडील पुण्याचे पालकमंत्री आहेत. तुमचं तुम्हाला तरी पटतंय का हे बोलताना? बाजार भावापेक्षा कमी दरात जमीन घेतली गेली आहे, खडसेंचा राजीनामा घेतला गेला होता. चौकशी होईपर्यंत नैतिकता राखून तुम्हीही राजीनामा द्या. न्या. झोटिंग समितीच्या धर्तीवर कोरेगाव पार्क प्रकरणातही समिती मुख्यमंत्री महोदयांनी नेमावी, अशी मागणी त्यांनी केलीय.

आणखी वाचा

आणखी वाचा

Comments are closed.