पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण – शीतल तेजवानी आहे कोण?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला केंद्र सरकारची आणि महार वतनाची जमीन विकणारी शीतल तेजवानी ही या व्यवहारामधील अत्यंत महत्त्वाचं पात्र आहे. शीतल तेजवानी हिचा पती सागर सूर्यवंशी हा सेवा विकास सहकारी बँकेच्या घोटाळ्यातील आरोपी आहे. सागरवर ईडीची चौकशीसुद्धा लागली होती. मात्र, त्या प्रकरणात पुढे काहीच झाले नाही.

कोरेगाव पार्क मुंढवा येथील ४० एकराचा भूखंड बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या ताब्यात होता. पुण्यातील ही जमीन सरकारच्या ताब्यातून सोडवणं आणि त्याच्या विक्रीसाठी कधीही रद्द न होणारी पॉवर ऑफ अटर्नी तेजवानी हिने मूळ २७२ मालकांना शोधत नाममात्र १० ते १५ हजार रुपये देऊन करून घेतली होती. त्यामुळे हा व्यवहार करताना शीतल तेजवानी हिने अतिशय थंड डोक्याने सगळा प्लॅन केला. कधीही रद्द न होणारी पॉवर ऑफ अटर्नी शीतल तेजवानी हिच्या नावावर करून घेतली.

पॉवर ऑफ अॅटर्नी म्हणजेच कुलमुखत्यार पत्र स्वतःच्या नावावर झाल्यानंतर शीतल तेजवानी हिने अमेडिया कंपनी हेरली. शीतल तेजवानी हिने या अमेडिया कंपनीतील भागीदारांचे नाव शोधून सगळा प्लॅन आखला. या अमेडिया कंपनीमध्ये ९९ टक्के भागीदारी होती ती अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि एक टक्का भागीदारी होती ती पार्थ पवार यांचा मामेभाऊ दिग्विजय पाटील यांची. शीतल तेजवानी हिचा पती सागर सूर्यवंशी हा सेवा विकास सहकारी बँकेच्या घोटाळ्यातील आरोपी आहे. सागरवर ईडीची चौकशी लागली होती. मात्र, त्या प्रकरणात पुढे काहीच झाले नाही.

घोटाळे आणि कर्ज

सागर सूर्यवंशी याने रेणुका लॉन्सच्या नावे २ वेगवेगळी वाहन कर्जे घेतली आहेत. यामध्ये १ कोटी १६ लाख रुपयांचे एक कर्ज आहे, तर दुसरे कर्ज हे २ कोटी २४ लाख रुपयांचे आहे. शीतल तेजवानीनेसुद्धा २ कारसाठी ४ कोटी ८० लाख कर्ज घेतलेलं आहे. इतकंच नाही तर सागर सूर्यवंशी याने सागर लॉन्सच्या नावावर १६ कोटी ४८ लाख कॅश क्रेडिट कर्जदेखील घेतलेले आहे. शीतल तेजवानीवर आणखी एक १० कोटींचे कर्ज आहे. या शीतल तेजवानीच्या पॅरामाऊंट इन्फ्रा कंपनीवर ५ कोटी ९५ लाखांचं कर्ज आहे. दुसरीकडे रेणुका लॉन्सच्या नावे आणखी ५ कोटी २५ लाखांचं कर्ज आहे. या दोघांचे एकूण कर्ज १०० कोटींच्या घरात असल्याची माहिती आहे.

दुय्यम निबंधक कार्यालयावर बावधन पोलिसांचा छापा

पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन खरेदी-विक्री घोटाळ्याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. ६) गुन्हा दाखल झाल्यानंतर शुक्रवारी बावधन पोलिसांनी पाषाण येथील दुय्यम निबंधक कार्यालयावर छापा टाकून घटनास्थळाचा पंचनामा केला. नोंदणी झालेली कागदपत्रे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासासाठी जप्त केली. मात्र, या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्राइजेस एलएलपी कंपनीने पुण्याच्या कोरेगाव पार्क येथील १ हजार ८०० कोटी रुपये किमतीचा महार वतनाचा ४० एकरांचा भूखंड अवघ्या ३०० कोटी रुपयांत विकत घेतल्याचा घोटाळा समोर आला आणि राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली. या प्रकरणात अमेडिया एंटरप्राइजेस कंपनीचे भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील, जमीन विक्रीदार कुलमुखत्यारधारक शीतल किशनसिंह तेजवानी आणि सहदुय्यम निबंधक रवींद्र बाळकृष्ण तारू यांच्यावर बावधन पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. सहजिल्हा निबंधक संतोष अशोक हिंगाणे यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’, अंबादास दानवे यांचा टोला

या प्रकरणात बावधन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शुक्रवारी पाषाण येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने नोंदणी करण्यात आलेला सर्व दस्ताऐवज जप्त केला. जप्त केलेल्या कागदपत्रांच्या आधारे तपास करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

Comments are closed.