भंगार बसमधून प्रवाशांची वाहतूक; तुटलेल्या काचा, मोडलेल्या सीट, दरवाजे खिळखिळे

जव्हार आगाराच्या बहुतांश एसटी बसेसची दुरवस्था झाली आहे. अनेक गाड्यांचे छत फाटले आहेत. खिडकीच्या तुटलेल्या काचा, मोडलेल्या सीट, खिळखिळे झालेले दरवाजे यामुळे या गाड्या भंगारात निघाल्या आहेत. या भंगार गाड्यांमधूनच प्रवाशांची धोकादायक वाहतूक सुरू आहे. जव्हार आगाराच्या गलथान कारभार प्रवाशांच्या जीवावर उठला आहे. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होता आहे.

जव्हार एसटी आगारात ५६ बस आहेत. यातील ४० हून अधिक बसेस मोडकळीस आल्या आहेत. अनेक बसचे पत्रे तुटलेले आहेत, बसला गळती लागली आहे, खिडक्यांच्या काचा तुटलेल्या आहेत, गाडीतील सीट तुटल्याने या गाड्या भंगारात निघाल्या आहेत. त्याच अवस्थेत प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. भंगारात निघालेल्या बसमधून विद्यार्थी आणि प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. जव्हारहून संध्याकाळी चार वाजता मोखाडा तालुक्यातील केवनाळा या अतिदुर्गम गावाकडे जाणारी बस तर अक्षरशः खिळखिळी झालेली आहे. सीट मोडलेल्या असल्यामुळे प्रवासी उभ्यानेच प्रवास करतात. अनेक जण तर जीवाच्या भीतीने या बसमधून प्रवास करणे टाळतात. भगर बसमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड संताप आहे.

आमच्या जीवाचे मोल आहे की नाही?
लांबपल्ल्याच्या प्रवाशांसाठी लक्झरी बसची सुविधा असते. मग ग्रामीण भागासाठी भंगार बसेस का? आदिवासी, वयोवृद्ध, विद्यार्थी यांच्या जीवाचे मोल आहे की नाहा, असा सवाल ज्येष्ठ नागरिक देवराम कामडी यांनी एसटी प्रशासनास केला आहे.

Comments are closed.