इमरान खान यांच्या समर्थनात पॅट कमिन्स पुढे आला, म्हणाला ‘त्यांच्याशी तसाच…’

ऑस्ट्रेलियाचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार पॅट कमिन्स देखील पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि क्रिकेट संघाचे माजी कर्णधार इम्रान खान यांच्या समर्थनात पुढे आला आहे. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने पाकिस्तानच्या माजी कर्णधाराबद्दल भाष्य केले. कमिन्सने म्हटले की, इम्रान खान यांच्याबद्दल बोलणाऱ्या सर्व माजी कर्णधारांच्या समर्थनाला तो आपला पाठिंबा जोडत आहे.

​’द क्रिकेट ग्रेडर’च्या ‘X’ (ट्विटर) अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू ग्रेग चॅपल यांनी इम्रान खान यांच्या परिस्थितीबद्दल अपडेट दिले. चॅपल म्हणाले की, “ते गेल्या तीन वर्षांपासून एकांतात आहेत. या परिस्थितीचा सामना कोणी कसा करू शकतो, हे मला समजत नाही. मी ज्यांच्याविरुद्ध क्रिकेट खेळलो आहे, त्या सर्वांप्रमाणेच इम्रान मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप मजबूत आहेत. त्यांना पुस्तके वाचण्याची परवानगी आहे की नाही, हे मला ठाऊक नाही. ते बहुतांश वेळ अंधारातच असतात. हे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी योग्य नाही. मी 6 वर्षांपूर्वी पाकिस्तानमध्ये त्यांना भेटलो होतो.” यानंतर त्यांनी इम्रान खान यांच्या इतर अडचणींवरही भाष्य केले.

​पॅट कमिन्सने ‘X’ वर लिहिले, “मी ग्रेग चॅपल आणि इतर माजी आंतरराष्ट्रीय कर्णधारांच्या समर्थनाला माझा पाठिंबा देतो. मला आशा आहे की न्यायालयाच्या आदेशानुसार वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण होऊ दिली जाईल आणि कुटुंबातील सदस्यांची भेट घेण्याची प्रक्रिया सुरूच राहील. मला आशा आहे की इम्रान खान यांच्याशी ते ज्या आदरास पात्र आहेत, तसाच सन्मानपूर्वक व्यवहार केला जाईल.”

​विशेष म्हणजे, 21 माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी इम्रान खान यांच्यासाठी आवाज उठवत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना पत्र लिहिले होते. या पत्राद्वारे तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांना योग्य वैद्यकीय उपचार देण्याची मागणी करण्यात आली होती. ऑगस्टपूर्वी फेब्रुवारीमध्येही अनेक माजी क्रिकेटपटूंनी इम्रान यांच्यासाठी पत्र लिहिले होते. त्यावेळीही त्यांच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती.

Comments are closed.