आयुर्वेदाला अधुनिक बनवत जागतिक कंपन्यांना टक्कर, पंतंजलीनं FMCGचा चेहरा कसा बदलला?

पतंजली: एका छोट्याशा औषधाच्या दुकानातून सुरू झालेली पतंजली आयुर्वेद लिमिटेड आज भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी एफएमसीजी (फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स) कंपनी बनली आहे. कंपनीचा दावा आहे की, आज भारतातील तिसरी सर्वात मोठी एफएमसीजी कंपनी बनली असून तिचा टर्नओव्हर 45,000 कोटी रुपयांहून अधिक आहे. भारतीय संस्कृती, आयुर्वेद आणि आत्मनिर्भरतेच्या तत्त्वांवर आधारित असलेला पतंजलीचा व्यवसाय मॉडेल ग्राहकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आहे.

स्वदेशी ओळख हे यशाचं प्रमुख कारण

भारताची संस्कृती, आयुर्वेद आणि आत्मनिर्भरता पतंजलीच्या यशाचा पाया आहे.  कंपनीने नेहमीच ‘मेड इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ यांची जोरदार उभारी घेतली. साबण, शॅम्पू, तेलं, अन्नपदार्थ, औषधं – सगळं काही आयुर्वेद आणि नैसर्गिक घटकांवर आधारित आहे. आणि हेच ग्राहकांच्या मनाला भावतं. योगगुरु बाबा रामदेव यांचं प्रसिद्धीमाध्यमांवरील सशक्त आणि विश्वासार्ह व्यक्तिमत्त्वदेखील या ब्रँडसाठी फायद्याचं ठरलं. त्यांनी योग आणि आरोग्याच्या माध्यमातून पतंजलीचं नाव घराघरात पोहोचवलं.

कमी खर्चाचं मॉडेल, स्वस्त उत्पादने

पतंजलीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कमी खर्चात तयार होणारी उत्पादने. कंपनी थेट शेतकऱ्यांकडून कच्चा माल विकत घेते, त्यामुळे उत्पादन खर्च कमी राहतो आणि वस्तू स्वस्त मिळतात. शिवाय, स्वतःचे रिटेल स्टोअर्स आणि डायरेक्ट-टू-कस्टमर विक्रीमुळे मधल्यामध्ये खर्च होणारा पैसा वाचतो. याचमुळे पतंजलीची उत्पादने इतर ब्रँड्सपेक्षा 15-30 टक्क्यांनी स्वस्त असतात. त्यामुळे मध्यमवर्गीय आणि निम्न-मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये पतंजलीची पहिली पसंती असते.

संशोधन आणि नवकल्पनांना प्राधान्य

अनेकांना वाटतं पतंजली म्हणजे फक्त आयुर्वेदिक औषधं. पण कंपनीचं आर अँड डी (संशोधन व विकास) केंद्र सातत्याने नविन उत्पादने विकसित करत असतं. मग ते च्यवनप्राश असो, आरोग्यदायी नूडल्स, किंवा परिधान ब्रँड. 2019 मध्ये पतंजलीने रुचि सोया कंपनीचा ताबा घेतला आणि त्यातून वितरण व्यवस्था आणखी मजबूत केल्याचा दावा पतंजली करते.

जागतिक ब्रँड्सनाही दिली टक्कर

आज पतंजली जागतिक दिग्गज कंपन्यांसमोर उभी आहे तेही आपल्या देशी पद्धतीनं. कंपनी म्हणते, “ पतंजली केवळ एक कंपनी नसून, स्वदेशी आणि आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन देणाऱ्या एका व्यापक चळवळीचं रूप आहे.आम्ही केवळ उत्पादने विकत नाही, आम्ही आरोग्यदायी, स्वदेशी आणि नैसर्गिक जीवनशैलीचं मूल्य लोकांपर्यंत पोहोचवतो.”

आणखी वाचा

Comments are closed.