पवन कल्याणची तामिळनाडूची टीका
वृत्तसंस्था / विजयवाडा
‘तामिळनाडूच्या द्रमुक सरकारला हिंदी भाषेचे वावडे आहे. तथापि, तामिळ भाषेतील चित्रपट हिंदी भाषेत रुपांतरीत करुन ते उत्तर भारतात दाखविण्याला आणि तेथून पैसा मिळविण्याला या सरकारचे समर्थन आहे,’ अशी टीकात्मक टिप्पणी आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांनी केली आहे. सध्या केंद्र सरकारचे नवे शिक्षण धोरण आणि त्रिभाषा सूत्राला तामिळनाडू सरकारचा प्रचंड विरोध आहे. हे सरकार चालविणाऱ्या द्रमुक या पक्षाने दक्षिण भारतातील राज्यांची या मुद्द्यावर मोट बांधण्याचा प्रयत्न चालविला आहे. अशा स्थितीत दक्षिण भारतातीलच एक असणाऱ्या आंध्र प्रदेश राज्याच्या महत्वाच्या नेत्याने केलेल्या या टिप्पणीला राजकीय वर्तुळात महत्व देण्यात येत आहे.
पवन कल्याण यांनी आपल्या राजकीय पक्षाच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमात हे मतप्रदर्शन केले आहे. भारताची एकात्मता संवर्धित करणे हे महत्वाचे आहे. यासाठी अनेक भाषांना आपण प्राधान्य दिले पाहिजे. तामिळनाडू सरकारच्या धोरणाप्रमाणे केवळ दोन भाषांवर भर देऊन चालणार नाही. आपल्याला देशाच्या एकात्मतेसाठी अधिक भाषा शिकण्याची आणि संवर्धित करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आमचा तामिळनाडूच्या धोरणांना विरोध आहे, अशी स्पष्टोक्ती पवन कल्याण यांनी त्यांच्या भाषणात केली आहे.
केंद्र सरकारचे समर्थन
केंद्र सरकारच्या नव्या शिक्षण धोरणाचे आणि त्रिभाषा सूत्राचे पवन कल्याण यांनी समर्थन केले आहे. या धोरणात काहीच आक्षेपार्ह नाही. संकुचित राजकारण टाळून या धोरणाचा विचार व्हावा, असे आवाहनही त्यांनी केले. भारतीय जनता पक्षाने पवन कल्याण यांचे समर्थक केले असून त्यांचे आभारही मानले आहेत. पवन कल्याण यांनी देशहिताला महत्व देण्याची भूमिका घेतली असून ती अत्यंत स्पृहणीय आहे, अशा अर्थाची प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाने व्यक्त केली आहे.
संस्कृतविषयीही प्रेम व्यक्त
पवन कल्याण यांनी त्यांच्या भाषणात केवळ हिंदीच नव्हे, तर संस्कृत भाषेसंबंधीही आपुलकी व्यक्त केली आहे. काही लोक संस्कृत भाषेवर का राग व्यक्त करतात हे मला समजू शकत नाही. द्रविडी राजकारणी हिंदीला विरोध करतात पण आपल्या भाषेतील चित्रपट हिंदीत आणून बॉलिवुडमधून पैसा का कमावतात, असाही सणसणीत टोला त्यांनी त्यांच्या भाषणात लगावला आहे.
Comments are closed.