PBKS vs DC IPL 2025 : दिल्लीचा पंजाबला दे धक्का
पीबीके वि डीसी आयपीएल 2025: काल झालेल्या पंजाब विरुद्ध दिल्ली संघांमधील सामन्यात दिल्ली संघाने पंजाबवर विजय मिळवत आपल्या प्रवासाची सांगता गोड केली…गेल्या तीन सामन्यात अव्वल असणारे तीन संघ आश्चर्यकारकरीत्या पराभूत होत आहेत…पण आता पुढील प्रवासात पंजाब संघाला मुंबई, गुजरात संघाला चेन्नई..आणि बंगळूर संघाला लखनौ संघासोबत खेळायचे आहे….यात गुजरात संघाची लढत सोपी असेल असे मानू या…पण या शेवटच्या सामन्यात जो विजयी होईल तोच पहिल्या दोनमध्ये राहील आणि त्याला अधिकच्या एक सामना खेळण्याचे तिकीट मिळेल…मुंबई संघाने पंजाबवर मात केली तर सरस धावगतीच्या जोरावर ते सुद्धा पहिल्या दोघांमध्ये जाऊ शकतात जर गुजरात आणि बंगळूर त्यांच्या पुढील सामन्यात पराभूत झाले तर…पण आता तरी प्रत्येक संघासाठी ही वाट दूर जाते असेच म्हणावे लागेल..
काल प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघाने 206 धावा केल्या. पहिल्यांदा प्रभ सिमरन आणि इंग्लिस यांच्या मधील झालेल्या 22 चेंडूत 47 धावांच्या भागीदारी नंतर श्रेयस याच्या 54 धावा आणि स्टोइनिस याच्या आक्रमक 16 चेंडूत 44 केल्या…स्टोइनिस हा जेव्हा पूर्ण भरात असतो तेव्हा त्याचे मोठे फटके खेळण्याचे कौशल्य किती मोठे आहे हे दिसते…त्याने मारलेले 4 षटकार अगदी सहज होते…शेवटच्या सामन्यात मुस्तफिझुर याने 3 बळी घेतले तर कुलदीप आणि निगम यांनी प्रत्येकी 2 बळी घेऊन पंजाब संघाच्या धावसंख्येला लगाम घातला ….पण दिल्ली संघाकडून आज कमाल केली ती स्टब ने…आपण फलंदाजी आणि गोलंदाजी तर उत्तम करतोच पण यष्टिरक्षण सुद्धा त्याच ताकदीचे करतो हे त्याने काल दाखवून दिले..निगम च्या गोलंदाजीवर इंग्लीस याला यष्टीचीत करताना त्याने दाखविलेली चपळाई धोनीने सुद्धा मिरविली असती.. इंग्लिस हा धोकादायक फलंदाज होता बाद होण्यापूर्वी त्याने 12 चेंडूत 33 धावा केल्या होत्या…
धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दिल्ली संघाने आश्वासक सुरुवात केली..55 धावांच्या सलामी नंतर राहुल आणि डुप्लेसी बाद झाले…त्यानंतर ज्या 11 व्या षटकात अटल बाद झाला त्याच षटकात सलग 4 चौकार मारून करुण नायर याने भारतीय संघात झालेल्या निवडीचा जणू काही उत्सव सुरू केला…देशांतर्गत स्पर्धेत त्याने खोऱ्याने धावा काढल्या पण या आय पी एल स्पर्धेत सुरुवातीची मुंबई विरुद्ध आणि आजची शेवटची पंजाब विरुद्ध केलेली खेळी पाहून त्याच्याकडील असलेल्या फटक्यांची यादी लक्ष्यात येते…भारतीय संघात निवड झालेला हा खेळाडू या अगोदर इंग्लंड संघाविरुद्ध त्रिशतक करून बसला आहे…ही गोष्ट त्याला आणि भारतीय संघाला आत्मविश्वास देणारी ठरेल..काल त्याने जॉन्सन याला मारलेल्या ऑफ ड्राईव्ह चा षटकार डोळ्यांना आनंद देणारा ठरला… करुण याने काल 30 चेंडूत 61 धावांची भागीदारी रिझवी सोबत केली…आणि तिथेच त्याने दिल्ली संघाच्या विजयाचा पाया रचला…
काल लक्ष वेधून घेतले ते समीर रिझवी या फलंदाजाने…उत्तर प्रदेश मधील हा खेळाडू या आधी चेन्नई संघात होता.. त्याला चेन्नई संघाने का रिटेन केले नाही ? कारण आज चेन्नई संघाची मधली फलंदाजी पाहिली तर जडेजा त्यांचा सर्वात मोठा फलंदाज वाटतो…काल रिझवी याने स्टब सोबत 27 चेंडूत 53 धावांची भागीदारी करताना 5 षटकार लगविले…मोठे फटके तो अगदी सहज खेळतो…काल दिल्ली संघाच्या विजयात तो सामनावीर ठरला आणि या स्पर्धेचा शेवट गोड केला…
पंजाब संघाला आता आपल्या विजया सोबत इतरांच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागेल..कारण पूर्ण भरात असलेल्या मुंबई संघासोबत विजय मिळविणे या घडीला तितकेसे सोपे नाही याची जाणीव पाँटिंग अय्यर जोडीला असणार..म्हणूनच क्रमांक एक आणि दोनची वाट…पंजाब संघासाठी अवघड आहे…पंजाब संघासाठी ही वाट दूर जाते सध्या तरी असेच म्हणावे लागेल..
संबंधित बातमी:
MI vs DC IPL 2025: सुर्याचा धीर, गोलंदाजीत बुमराह-सँटनर वीर
अधिक पाहा..
Comments are closed.