पीसीबी चीफ मोहसीन नकवींना दिवसा सुचतायत स्वप्न; आयपीएल आणि पीएसएलच्या तुलनेवरून केलं विचित्र वक्तव्य
इंडियन प्रीमियर लीग (IPL) आणि पाकिस्तान सुपर लीग (PSL) यांच्यात सध्या जमीन-अस्मानाचा फरक दिसून येतो. कोणत्याही बाबतीत पाकिस्तानची ही लीग आयपीएलच्या आसपासही कुठे दिसत नाही. असे असूनही, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे सदस्य आपल्या लीगबद्दल मोठी विधाने करताना आढळतात. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसीन नकवी यांनीही आयपीएल आणि पीएसएलबाबत एक मोठे आणि धक्कादायक विधान केले आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नकवी यांच्या मते, लवकरच पीएसएल ही जगातील नंबर १ क्रिकेट लीग बनेल. पीसीबी ‘बोर्ड ऑफ गव्हर्नर्स’च्या बैठकीत बोलताना त्यांनी हे अजब विधान केले. पीएसएल आता गुंतवणुकीच्या बाबतीत सर्वांची पसंती ठरत आहे, असे त्यांना वाटते. ते म्हणाले, “पीएसएल आता गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम मार्केट बनले आहे. तो दिवस दूर नाही जेव्हा पीएसएल जगातील नंबर १ लीग असेल.” विशेष म्हणजे नकवी हे विधान अशा वेळी करत आहेत, जेव्हा पाकिस्तान सुपर लीग २०२६ फक्त दोन शहरांमध्ये खेळवली जात आहे. त्याशिवाय, चाहत्यांचाही स्टेडियममध्ये म्हणावा तसा प्रतिसाद दिसत नाहीये. दुसरीकडे, आयपीएल १२ शहरांमध्ये चाहत्यांच्या अलोट गर्दीत खेळवली जात आहे.
पैशांच्या बाबतीत इंडियन प्रीमियर लीग स्पष्टपणे नंबर १ वर आहे. खेळाडू सर्वाधिक कमाई याच लीग मधून करतात. आयपीएलच्या मीडिया राइट्सचे मूल्य सध्या सुमारे ६ बिलियन अमेरिकन डॉलर्स इतके आहे, तर पाकिस्तान सुपर लीगच्या मीडिया राइट्सचे मूल्य केवळ ९३ मिलियन डॉलर्स सांगितले जाते. आयपीएल प्रत्येक सीझनमध्ये साधारण १ बिलियन डॉलर्सची कमाई करते, तर पीएसएलची कमाई साधारण ६० मिलियन डॉलर्सच्या आसपास आहे. अशा परिस्थितीत पीएसएलला ‘नंबर १’ म्हणणे हे निव्वळ एक हास्यास्पद विधानच वाटते.
Comments are closed.