PCBनेच सोडली पाकिस्तान संघाची साथ! शेजारच्या देशाने घेतला मोठा निर्णय

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स 2025 मध्ये असे दोन प्रसंग घडले, जेव्हा इंडिया चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स या दोन संघांचा आमना-सामना होणार होता. मात्र दोन्ही वेळा युवराज सिंगच्या नेतृत्वाखालील इंडिया चॅम्पियन्सने पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार दिला. एकाच स्पर्धेत दोनदा अशी अपमानास्पद परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड खूपच नाराज आहे. याच कारणामुळे त्यांनी आता पाकिस्तान चॅम्पियन्स संघावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

डब्ल्यूसीएल 2025 मध्ये झालेल्या अपमानानंतर पीसीबीने पाकिस्तानला या टूर्नामेंटमधून बॅन केले आहे. त्यामुळे आता पुढच्या हंगामात पाकिस्तानचा संघ या स्पर्धेत दिसणार नाही. प्रत्यक्षात पाकिस्तान क्रिकेट बोर्डला हेच हवे आहे की, कुठल्याही खासगी लीगमध्ये ‘पाकिस्तान’ या नावाने कोणताही संघ खेळू नये. मात्र, पाकिस्तानी खेळाडू इतर नावाने या टूर्नामेंटचा भाग होऊ शकतात. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार पीसीबीने एक महत्त्वाची बैठक घेऊन हा मोठा निर्णय घेतला आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्समध्ये पाकिस्तानच्या संघाने सलग दोन वेळा अंतिम फेरी गाठली होती, पण दोन्ही वेळा त्यांना विजेतेपद मिळवता आले नाही.

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्सनंतर आता आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन संघांमध्ये थेट सामना होणार आहे. पीसीबीचे म्हणणे आहे की खासगी लीगमध्ये आयसीसीचा फारसा हस्तक्षेप नसतो, त्यामुळेच भारताने नकार दिल्यावर कोणतीही कारवाई होऊ शकत नाही. ह्याच कारणामुळे पीसीबी अशा खासगी लीगमध्ये ‘पाकिस्तान’ या नावाचा वापर होऊ नये, याच्या विरोधात आहे. जर कोणत्याही खासगी लीगमध्ये ‘पाकिस्तान’ या नावाचा वापर करायचा असेल, तर संबंधित आयोजकाला पीसीबीकडून परवानगी घ्यावी लागेल.

Comments are closed.