पेणमधील हजारो विद्यार्थी एसटी पासपासून वंचित, शासकीय परिपत्रकाचा अधिकाऱ्यांनी काढला मनमानी अर्थ

एमएससीआयटीचे प्रशिक्षण घेणारे पेण तालुक्यातील हजारो विद्यार्थी एसटीच्या पाचपासून वंचित राहिले आहेत. या विद्यार्थ्यांना सवलतीचे पासेस देण्यात येऊ नयेत, अशी तक्रार शहरातील टायपिंग इन्स्टिट्यूटच्या चालकांनी केली आहे. त्यानंतर अधिकाऱ्यांनी शासकीय परिपत्रकाचा मनमानी अर्थ लावून एमएमसीआयटीचे प्रशिक्षण घेणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना सवलतीचे पास नाकारले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आता तिकीट काढून प्रवास करावा लागत असल्याने त्यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, शासकीय सेवेत येणाऱ्या सर्वच उमेदवारांना एमएचसीआयटीचा कोर्स सक्तीचा करण्यात आला आहे. मात्र हा कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना पास नाकारला जात असल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

शासनाने विद्यार्थ्यांच्या कॉम्प्युटर ज्ञानाकरिता एमएससीआयटीचे प्रशिक्षण राज्यभर सुरू केले आहे. एमएससीआयटी कोर्स शासनमान्य असल्याने या प्रशिक्षणाचा लाभ राज्यातील लाखो विद्यार्थी दरवर्षी घेत आहेत. रायगड जिल्ह्यात 2023 साली 17 हजार 773, 2024 साली 15 हजार 959 विद्यार्थ्यांनी एमएससीआयटीचा कोर्स केला आहे. शासकीय नोकरीकरिता हा कोर्स करणे सक्तीचे असल्याने राज्यातील लाखो विद्यार्थी हा कोर्स दरवर्षी करतात. मात्र हाच कोर्स करणाऱ्या पेण तालुक्यातील विद्यार्थ्यांना एसटीचा पास दिला जात नाही. त्यामुळे त्यांना इतर प्रवाशांप्रमाणे पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे.

Comments are closed.