अरविंद केजरीवाल यांच्या कार्यक्रमाची परवानगी रद्द करण्यात आली आहे.

आप’कडुन गुजरात सरकारवर आरोप

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

गुजरातमध्ये  आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. आम आदमी पक्षाने गुजरात सरकारवर गंभीर आरोप करत अरविंद केजरीवालांच्या अहमदाबाद येथीलकार्यकर्ते संमेलनाची अनुमती जाणूनबुजून रद्द करविण्यात आल्याचा दावा केला आहे.

केजरीवाल यांचा रविवारी कार्यकर्त्यांसोबत संवाद कार्यक्रम आयोजित होणार होता, पक्षाने याकरता यापूर्वीच एक खासगी स्थळ भाडेतत्वावर घेत पूर्ण तयारी केली होती. परंतु भाजपने शनिवारी रात्रीपासूनच हुकुमशाही अन् दादागिरी सुरू केली. कार्यक्रमस्थळाच्या मालकाला धमकाविण्यात येत कार्यक्रम रोखण्यात आल्याचा आरोप आप आमदार गोपाळ इटालिया यांनी रविवारी केला आहे.

आम आदमी पक्षाचा वाढता प्रभाव पाहून भाजप घाबरला असून याच भीतीपोटी आमचा कार्यक्रम रोखण्यात आला आहे. यापूर्वीही आमच्या पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आले आहे. आमचा पक्ष थांबणार नाही तसेच झुकणार देखील नाही. शांततापूर्ण राजकीय कार्यक्रम रोखणे राज्यघटना आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात असल्याचा दावा इटालिया यांनी केला आहे. आप संयोजक अरविंद केजरीवाल हे 17-19 जानेवारीपर्यंत तीन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत.

Comments are closed.