महिन्याअखेरीस पैसे संपले, कर्जाचा हफ्ता थकला, या 8 आर्थिक सवयींनी करा पैशांचं मॅनेजमेंट, वाचा

वित्त: महिन्याअखेरीस पैसे संपले किंवा कर्जाचा हप्ता थकला, अचानक एखादी आपत्कालिन समस्या आली अशा कितीतरी घटना घडतात. पण पैशांचं योग्य व्यवस्थापन हाच त्यावरचा उपाय आहे. आपल्या पैशांचं योग्य व्यवस्थापन करायला खूप मोठे बदल करावे लागत नाहीत. काही साध्या-सोप्या सवयी अंगीकारल्या, तर तुमचं आर्थिक आयुष्य अधिक मजबूत होऊ शकतं.  अनेकदा दीर्घकाळ टिकवलेल्या सातत्यपूर्ण, व्यवहार्य सवयी पुरेशा ठरतात.आपल्या पैशाचे चातुर्याने व्यवस्थापन करण्याच्या तसेच भविष्यकाळासाठी सुरक्षितपणे पैसा साठवण्याच्या व्हिसाने सुचवलेल्या 8 सोप्या सवयी समजून घेऊ..

1. पैशाबाबत चातुर्याने उद्दिष्टे निश्चित करा:

आपली आर्थिक उद्दिष्टे नेमकी, मापनीय, आवाक्यातील, सुसंबद्ध व कालबद्ध ठेवा. सुट्टीसाठी बचत करणे असो किंवा कर्जाची परतफेड असो; मासिक किंवा अगदी साप्ताहिक टप्प्यांमध्ये उद्दिष्टांची फोड केल्यास स्वत:च्या प्रगतीचा आढावा घेण्यात आणि स्वत:ला प्रेरणा देत राहण्यात ते उपयुक्त ठरते.

2. आर्थिक शिक्षणासाठी वेळ द्या:

दर आठवड्याला वैयक्तिक आर्थिक नियोजनाबाबत शिकण्यासाठी फक्त 30 मिनिटांचा वेळ काढा. बचतीबाबतच्या निर्णयांसाठी, गुंतवणूकीसाठी व कर्ज व्यवस्थापनासाठी छोटे, सहज समजण्याजोगे धडे उपयुक्त ठरतात.

3. आर्थिक गैरसमज ओळखा:

‘डिजिटल वॉलेट्स बँक व्यवहारांच्या तुलनेत असुरक्षित’ असतात यांसारख्या सामान्य गैरसमजांचा अभ्यास करण्यासाठी वेळ काढा. आर्थिक साक्षरता प्राप्त केल्यास महागड्या ठरू शकतील अशा चुका टाळण्यात आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यात मदत होते.

4. बजेटिंगच्या पद्धतींवर हुकूमत मिळवा:

50/30/20 नियमासारख्या बजेटिंगच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनांचा अनुभव घ्या आणि तुमच्या जीवनशैलीसाठी त्यातील कोणती पद्धत सर्वोत्तम आहे ते ठरवा. ही साधने समजून घेतल्यास आपल्याकडील पैशाचा ओघ व बचत यांवर नियंत्रण मिळवण्यात मदत होते. खर्चावर मर्यादा घालण्याची सोय करून देणारी बँकिंग अॅपवरील साधने नक्की वापरा.

5. सुरक्षित डिजिटल पेमेंट्सचा वापर करा:

ऑनलाइन खरेदी करताना, सुरक्षितता खूप महत्त्वाची असते. अपरिचित वेबसाइट्स किंवा असुरक्षित अॅप्सवर आपले कार्डाचे तपशील वापरणे किंवा स्टोअर करणे टाळा. आपल्या कार्डावरून होणाऱ्या व्यवहारांचा इशारा देणारी यंत्रणा सक्रिय केल्यास अधिक सुरक्षितता प्राप्त होऊ शकते.

6. आपत्कालीन निधी राखून ठेवा:

अनेकदा अचानक एखादा खर्च येतो. पण पुरेशी रक्कम जवळ नसल्याने अनेकांची दमछाक होते. त्यामुळे अनपेक्षित खर्चांची काळजी घेण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यापासूनच आपत्कालीन निधी राखून ठेवा. त्यामुळे आर्थिक फटके टाळले जाऊ शकतात आणि आकस्मिक परिस्थितीत मन:शांती टिकून राहते.

7. कर्जाचे व्यवस्थापन चातुर्याने करा:

उत्तम क्रेडिट स्कोअर राखण्याचा व कर्ज जबाबदारीने व्यवस्थापित करण्याचा प्रयत्न करा. परतफेडीचा इतिहास चांगला असेल तर कर्ज मंजूर होणे, अधिक चांगला व्याजदर मिळणे यांसाठी तसेच आर्थिक आरोग्य चांगले राखण्यासाठी ते उपयुक्त ठरते.

8. चांगली गुंतवणूक सुरू करा:

समभाग, बॉण्ड्स, म्युच्युअल फंड्स यांसारख्या मूलभूत गुंतवणूक पर्यायांबद्दल जाणून घ्या आणि दीर्घकाळात संपत्ती संचयासाठी लवकर, माहितीपूर्ण पद्धतीने गुंतवणूक सुरू करा.या आर्थिक चांगल्या सवयी समजून घेणे व त्यावर कृती करणे यांतून खऱ्या अर्थाने आर्थिक आत्मविश्वास येतो.तुमचे ज्ञान व सवयी पक्क्या करा आणि बाकीच्यांनाही अधिक सुरक्षित आर्थिक भवितव्याच्या दृष्टीने मदत करा.

अधिक पाहा..

Comments are closed.