100 वर्षांत पहिल्यांदाच असा थरार, पर्थचा पहिला दिवस ठरला ऐतिहासिक! स्टोक्स-स्टार्कची शानदार खेळी
ऍशेस मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस पूर्णपणे गोलंदाजांच्या नावावर राहिला (ENG vs AUS). टॉस जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजी घेतली, पण संपूर्ण संघ फक्त 172 धावांमध्ये ऑलआऊट झाला. मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) जबरदस्त गोलंदाजी करत 7 विकेट घेतल्या आणि इंग्लिश फलंदाजी पूर्णपणे कोलमडून टाकली. पण कांगारू फलंदाजांची स्थिती तर आणखी वाईट झाली. दिवसाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाने फक्त 123 धावांवर 9 विकेट गमावल्या. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने (Ben Stocks) सुद्धा घातक गोलंदाजी करत फक्त 6 षटकांत 23 धावांत 5 विकेट घेतल्या.
इंग्लंडला 172 धावांत आटोपल्यानंतर ऑस्ट्रेलिया फलंदाजीला आली, पण सुरुवातच खराब झाली. सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर जोफ्रा आर्चरने जेक वेदराल्डला शून्यावर बाद केले. त्यानंतर आर्चरने मार्नस लाबुशेनला देखील फक्त 9 धावांवर बाद केले. चौथ्या क्रमांकावर आलेला उस्मान ख्वाजा फक्त 2 धावा करून बाद झाला. कर्णधार स्टीव स्मिथ 17 धावा करून ब्रायडन कार्सकडून बाद झाला. ट्रेविस हेडने 21 धावा केल्या आणि तोही बाद झाला.
कॅमरून ग्रीन आणि अॅलेक्स कॅरी यांनी डळमळणारा ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण तोही फारसा यशस्वी ठरला नाही. कॅरी 26 धावा करून बाद झाला, तर ग्रीनला स्टोक्सने 24 धावांवर बाद केले. दिवसाच्या अखेरीस नाथन लायन 3 धावा, तर ब्रेंडन डॉगेट 0 धावांवर नाबाद होते.
कर्णधार बेन स्टोक्सने आपल्या कातिल गोलंदाजीने प्रेक्षकांना दाद द्यायला लावली. 6 षटकांच्या स्पेलमध्ये 23 धावा देऊन त्याने 5 महत्त्वाच्या विकेट घेतल्या.
याआधी इंग्लंडच्या फलंदाजांनी मिचेल स्टार्कच्या तीक्ष्ण गोलंदाजीसमोर सहज शरणागती पत्करली. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने सर्वाधिक 52 धावा, ओली पोपने 46 धावा, तर जेमी स्मिथने 33 धावा केल्या. यामुळे इंग्लंडचा डाव 172 धावांपर्यंत पोहोचू शकला. स्टार्कने 12.5 षटकांत 58 धावा देऊन 7 विकेट घेतल्या.
ऍशेस मालिकेच्या मागील 100 वर्षांत प्रथमच असे घडले की कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी 19 विकेट पडल्या. याआधी 1909 मध्ये ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर पहिल्या दिवशी 18 विकेट पडल्या होत्या. तर पर्थमध्ये पहिल्या दिवशी पडलेल्या विकेट्सची ही सर्वाधिक संख्या आहे. याआधी 2024 मध्ये भारत–ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) कसोटीच्या पहिल्या दिवशी 17 विकेट्स पडल्या होत्या.
Comments are closed.