बिबट्याची दुचाकीला धडक; अपघातात दुचाकीस्वार ठार

पेठ ते शिराळा या राज्यमार्गावर रेठरे धरण तलावाजवळील ओढय़ाच्या पुलावर बिबटय़ाने दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरू असताना गुरुवारी (दि. 19) त्यांचा मृत्यू झाला. सर्जेराव मारुती खबाले (45, रा. कापरी, ता. शिराळा) असे मयताचे नाव आहे.

सर्जेराव खबाले हे सोमवारी (दि. 16) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून पेठकडून शिराळ्याच्या दिशेने येत असताना रेठरे धरण तलावाच्या ओढय़ाच्या पुलाला असलेल्या उसाच्या शेतातून बिबटय़ाने थेट झेप घेतली. या वेळी तो खबाले यांच्या दुचाकीला धडकला. यामध्ये खबाले दुचाकीसह रस्त्यावर पडले. या अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते बेशुद्ध झाले. त्यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी कराड येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान गुरुवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.

दररोज होतेय दर्शन

सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरू असून अनेक भागांत बिबटय़ांचे बछडे दिसून येत आहेत. बिबटय़ांच्या वाढत्या संख्येने आणि पाळीव प्राणी व नागरिकांवरील वाढत्या हल्ल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दोन महिन्यांपूर्वी शिराळा येथील मोरणा धरण आणि सुगंधा नगर या भागात बिबटय़ाचे दर्शन झाले होते. घराबाहेर बांधलेली पाळीव कुत्री, शेळी बिबटय़ाच्या हल्ल्यात बळी पडत आहेत. शिराळा तालुक्यातील अनेक गावांमध्ये ग्रामस्थांना आता दररोज बिबटय़ाचे दर्शन होत असल्याने भीतीचे वातावरण आहे.

Comments are closed.