पीएफ व्याज दर 8.25 टक्के आहे

1 लाख रुपयांच्या ठेवीवर 8,250 रुपयांचे व्याज मिळणार : दोन वर्षांत पहिल्यांदाच कोणताही बदल नाही

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) ठेवींवर 8.25 टक्के व्याजदर कायम ठेवला आहे. ईपीएफओ संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने शुक्रवार, 28 फेब्रुवारीला झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गेल्या आठवड्यापासून शेअर बाजारात मोठी घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण होते. शेअर बाजारात आतापर्यंत लाखो लोकांचे कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत सरकारने पीएफवरील व्याजदर स्थिर ठेवत मोठा दिलासा दिला आहे.

देशातील सुमारे 7 कोटी कर्मचारी पीएफच्या कक्षेत येतात. सध्या कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात 1 लाख रुपये जमा असतील तर 8.25 टक्के दराने दरवर्षी 8,250 रुपये व्याज मिळेल. 2021-22 या आर्थिक वर्षासाठी सरकारने पीएफवरील व्याजदर 8.10 टक्क्यांपर्यंत पर्यंत कमी केला होता. हा दर 43 वर्षांतील सर्वात कमी होता. यापूर्वी, 2023-24 या आर्थिक वर्षासाठी व्याजदर 0.10 टक्क्यांनी वाढवत 8.15 टक्क्यांवरून 8.25 टक्के केला होता. तर 2022-23 मध्ये 0.05 टक्क्यांनी वाढवून 8.10 वरून 8.15 टक्के केला होता. आता शेअरबाजार सतत घसरत असतानाही ईपीएफओने व्याजदर कायम ठेवला आहे. ईपीएफओने बाजारात असलेल्या त्यांच्या निधीचा काही भाग उत्पन्न मिळविण्यासाठी वापरला आहे.

‘सीबीटी’च्या निर्णयाने कर्मचाऱ्यांना दिलासा

सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (सीबीटी) ही संस्था ईपीएफओबाबत निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था म्हणून ओळखली जाते. शुक्रवारी झालेल्या बैठकीत सीबीटीने 2024-25 साठी ईपीएफवर 8.25 टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. सीबीटीच्या निर्णयानंतर, 2024-25 साठी ईपीएफ ठेवींवरील व्याजदर मंजुरीसाठी अर्थ मंत्रालयाकडे पाठवला जाईल. अर्थ मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर 2024-25 साठी ईपीएफवरील व्याजदर ईपीएफओच्या सात कोटींहून अधिक सदस्यांच्या खात्यात जमा केला जाईल. अर्थ मंत्रालयामार्फत सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतरच ईपीएफओ व्याज जमा करते.

Comments are closed.