फिल साल्टने मोडला संजू सॅमसनचा विक्रम; पाहा टी20 मधील सर्वात जलद शतक करणाऱ्या खेळाडूंची यादी

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या टी20 सामन्यात फिल साल्टने आपल्या धडाकेबाज फलंदाजीची आतषबाजी करत केवळ 39 चेंडूत शतक ठोकले. त्याने भारतीय विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसनचा विक्रम मोडला. या शतकासह तो टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फुल मेंबर नेशन खेळाडूंपैकी सर्वात जलद शतक करणाऱ्यांच्या यादीत संयुक्त तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. याआधी वेस्ट इंडिजच्या जॉन्सन चार्ल्सने मार्च 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 39 चेंडूत शतक झळकावले होते. मँचेस्टरच्या मैदानावर साल्टने खेळताना फटकेबाजीचा पाऊस पाडला. त्याने 60 चेंडूत नाबाद 141 धावा ठोकल्या, ज्यात तब्बल 15 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता. त्याच्या या दमदार खेळीच्या जोरावर इंग्लंडने 304/2 असा विक्रमी डोंगर उभारला आणि टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला.

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात जलद शतकाचा मान दक्षिण आफ्रिकेच्या डेविड मिलरकडे आहे. ऑक्टोबर 2017 मध्ये बांगलादेशविरुद्ध त्याने अवघ्या 35 चेंडूत शतक पूर्ण केले होते. भारताचा हिटमॅन रोहित शर्मानेदेखील डिसेंबर 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 35 चेंडूत शतक ठोकले, मात्र तो मिलरच्या विक्रमाला मागे टाकू शकला नाही. पुढे भारतीय युवा फलंदाज अभिषेक शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा टीम डेविड यांनी 2025 मध्ये अनुक्रमे इंग्लंड आणि वेस्ट इंडिजविरुद्ध 37 चेंडूत शतक ठोकले होते.

या यादीत आता फिल साल्ट आणि जॉन्सन चार्ल्स संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत. दुसरीकडे, भारताचा संजू सॅमसन ऑक्टोबर 2024 मध्ये बांगलादेशविरुद्ध 40चेंडूत शतक झळकावून इंग्लंडचा जुना विक्रम मोडला होता. मात्र साल्टने त्याचाच विक्रम मोडत इंग्लंडसाठी सर्वात जलद शतक करणारा खेळाडू म्हणून आपले नाव कोरले आहे. त्याच्या या खेळीमुळे इंग्लिश चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली असून, इंग्लंडसाठी टी20 क्रिकेटमध्ये हा एक नवा टप्पा मानला जात आहे.

Comments are closed.