फिलीपाइन्स भूकंपाने हादरले; रिश्टर स्केलवर 5.7 तीव्रतेची नोंद

फिलिपाइन्स पुन्हा एकदा भूंकपाने हादरले असून तिथे रविवारी रात्री पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. लेयट बेटाच्या किनाऱ्यावर 5.7 तीव्रतेचा भूकंप झाल्याची नोंद करण्यात आली आहे. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणानुसार स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 5.05 वाजता हा भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचे केंद्र टाम्बोंगोनच्या नैऋत्येला सुमारे २ किलोमीटर अंतरावर आणि १० किलोमीटर खोलीवर होते. मात्र, अद्याप कोणतेही नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
लेयटे आणि मध्य विसायासमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र, आतापर्यंत कोणतेही नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपानंतरच्या धक्क्यांच्या अंदाजाने अधिकाऱ्यांनी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथकांना सतर्क केले आहे. इमारती आणि पुलांची तपासणी करण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
याआधी 10 ऑक्टोबर रोजी झालेल्या 7.6 रिश्टर स्केलच्या भूकंपातून देश सावरत असताना पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. या भूकंपानंतर मिंडानाओ प्रदेशात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. भूकंपाची खोली सुमारे 62 किलोमीटर होती, ज्यामुळे इंडोनेशियाने त्यांच्या उत्तर सुलावेसी आणि पापुआ प्रदेशांसाठी त्सुनामीचा इशारा जारी केला आहे.
गेल्या महिन्यात फिलीपाइन्समध्ये सर्वात भीषण भूकंपाचा धक्का बसला होता. तेव्हा सेबू बेटाजवळ 6.9 रिश्टर स्केलच्या भूकंपात किमान 72 लोकांचा मृत्यू झाला होता आणि शेकडो इमारतींचे नुकसान झाले होते. भूगर्भीय बदलामुळे फिलीपाइन्सला सातत्याने भूकंपाचे धक्के बसत असल्याचे तजज्ञांनी सांगितले. हा देश पॅसिफिक महासागरातील “रिंग ऑफ फायर” मध्ये आहे. जिथे अनेक टेक्टोनिक प्लेट्स एकमेकांना भिडतात. या प्लेट्सच्या हालचालींमुळे, फिलीपाइन्स हा जगातील सर्वात भूकंपप्रवण देशांपैकी एक आहे. सध्या, स्थानिक अधिकाऱ्यांनी जनतेला सतर्क राहण्याचे आणि अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
Comments are closed.