‘फूल और काँटे’चे दिग्दर्शक कुकू कोहली यांचे निधन; वयाच्या ७७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
‘फूल और काँटे’ या चित्रपटातून अभिनेता अजय देवगण याला पहिला ब्रेक देऊन रातोरात स्टार बनवणारे ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांचे आज सायंकाळी हृदयविकाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. अंधेरीतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी रिता, मुली करिष्मा आणि पूजा तसेच दुसरी पत्नी अभिनेत्री अरुणा इराणी असा परिवार आहे.
कुकू कोहली यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा देताना त्यांचे मित्र, निर्माते अशोक पंडित म्हणाले, हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे कुकू कोहली यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कुकू कोहली यांनी इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी पददेखील सांभाळले होते.
करिअरच्या सुरुवातीच्या काळात कुकू कोहली यांनी राज कपूर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षे काम करून चित्रपट दिग्दर्शनाचे कौशल्य आत्मसात केले. सनी देओलच्या ‘बेताब’ या चित्रपटाचे ते सहाय्यक दिग्दर्शक होते. १९९१ मध्ये ‘फूल और काँटे’ या चित्रपटातून कुकू कोहली यांनी स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले, जो प्रचंड यशस्वी ठरला.
दिग्दर्शित केलेले चित्रपट
‘फूल और काँटे’नंतर त्यांनी कोहराम (१९९१), सुहाग (१९९४), हकीकत (१९९५), अनाडी नं. १ (१९९९), जुल्मी (१९९९), यह दिल आशिकाना (२००२) या चित्रपटांचेही दिग्दर्शन केले होते. २००४ साली प्रदर्शित झालेला ‘वोह तेरा नाम था’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट ठरला.
Comments are closed.