निवडणूक अधिकाऱ्यांचे भाजप आमदारांशी पंचतारांकित हॉटेलमध्ये ‘गुफ्तगू’, पिंपरी- चिंचवड प्रभाग रचनेवर संशयाचे धुके

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती, सुनावणी झाल्यानंतर प्रशासनात ‘प्राविण्य’ मिळविलेल्या एका शासकीय अधिकाऱ्यासह पालिकेच्या दोन अधिकाऱ्यांबरोबर शहरातील भाजपच्या एका ‘दमदार’ आमदाराने चिंचवडमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये पाऊण तास गुफ्तगू केल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. त्यामुळे महापालिकेच्या प्रभाग रचनेवर संशयाचे धुके निर्माण झाले आहे.

महापालिकेने 22 ऑगस्टला चार सदस्यीय पद्धतीने 32 प्रभागांची प्रारूप रचना जाहीर करून नकाशे प्रसिद्ध केले. त्यानंतर या प्रभाग रचनेवर आलेल्या 318 हरकतींवर बुधवारी चिंचवड येथील सभागृहात एकाच दिवशी राज्याचे सहकार आणि विपणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी सुनावणी घेतली.

महापालिकेची आगामी निवडणूक ही 2017 च्या प्रभाग रचनेप्रमाणेच होणार आहे. ही रचना भाजपच्या मर्जीप्रमाणेच आणि भौगोलिक सलगता, मोठे रस्ते, प्रभागाची कशाही पद्धतीने मोडतोड केल्याचा आरोप अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार केला आहे. त्यामुळेच 2017 मध्ये भाजपचे 3 नगरसेवकांवरून 77 नगरसेवक निवडून येऊन एकहाती सत्ता मिळविली. आगामी निवडणुकीसाठी 2017 चीच प्रभाग रचना कायम राहावी, यासाठी भाजपच्या आमदारांचा, पदाधिकाऱ्यांचा आटापिटा सुरू आहे.

आयुक्तांची सुनावणीकडे धडा,

महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह हे लडाख येथे दि. 4 ते 9 सप्टेंबर या कालावधीत अभ्यास दौऱ्यासाठी गेले होते. त्यांच्याकडील आयुक्त पदाचा कार्यभार चार दिवस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांच्याकडे तर दि. 8 ते 9 सप्टेंबर या दोन दिवसांचा कार्यभार अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्याकडे देण्यात आला होता. आयुक्त सिंह महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी आहेत. त्यांच्या उपस्थितीत बुधवारी हरकतींवर सुनावणी होणार होती. मात्र, आयुक्त सिंह हे बुधवारी महापालिकेत अथवा हरकतीं सुनावणीकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे त्यांना निवडणुकीचे गांभीर्य आहे की नाही, असा सवाल राजकीय पदाधिकारी उपस्थित करत आहेत.

Comments are closed.