Pimpri Chinchwad News – आत्महत्या केलेल्या पत्नीच्या नावे खोटी चिठ्ठी; संगणक अभियंता पतीविरुद्ध गुन्हा दाखल

आजाराने एक वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्यानंतर त्यास पत्नीला जबाबदार धरून संगणक अभियंता असणाऱ्या पतीने तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आपल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समजू नये, यासाठी पतीने पत्नीच्या नावाने खोटी चिठ्ठी लिहून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना 25 फेब्रुवारी रोजी पिंपळे सौदागर येथे घडली.
हिमांशू दिनेश जैन (वय – 35, रा. पिंपळे सौदागर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. आत्महत्या केलेल्या 32 वर्षीय विवाहितेच्या वडिलांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी हिमांशू हा संगणक अभियंता आहे, तर आत्महत्या केलेली विवाहिता ही गृहिणी होती.
फिर्यादी यांचा जावई आरोपी हिमांशू याचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. त्यावरून पती-पत्नीत वाद होत असत. त्यांच्या एक वर्षीय मुलीचे 27 फेब्रुवारी 2024 रोजी आजारामुळे निधन झाले. मुलीच्या मृत्यूला पत्नीला जबाबदार धरून आरोपी हिमांशूने पत्नीला शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. सतत वाद घालून तिचा छळ केला.
पतीकडून वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आपल्यावर गुन्हा दाखल होऊ नये, याकरिता आरोपी हिमांशू याने पत्नीने चिठ्ठी लिहिली आहे, असे भासवून एक खोटी चिठ्ठी लिहून ठेवली, असे फिर्यादीत म्हटले आहे. फौजदार कणसे तपास करीत आहेत.
“चिठ्ठीतील हस्ताक्षर हे पत्नीचेच आहे की अन्य कोणाचे आहे, याची पडताळणी करण्यासाठी चिठ्ठी हस्ताक्षरतज्ज्ञाकडे पाठविण्यात येणार आहे.”
महेश बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सांगवी
Comments are closed.