तेल टँकरच्या सुरक्षेसाठी योजना तयार

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची महत्त्वाची बैठक : मध्यपूर्वेतील संकटाची पार्श्वभूमी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मध्यपूर्वेतील बिघडती स्थिती पाहता संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी उच्चस्तरीय बैठक घेतली असून ती सुमारे दीड तासापर्यंत चालली आहे. या बैठकीत देशाची ऊर्जा सुरक्षा आणि होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या भारतीय तेल टँकर्सच्या सुरक्षेवरून विस्तृत चर्चा झाली. कर्तव्य भवन-2 मध्ये झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत सीडीएस अनिल चौहान, तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भाग घेतला.

या उच्चस्तरीय बैठकीचा उद्देश भारतीय ध्वज असलेल्या जहाजांची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि महत्त्वपूर्ण सागरी मार्गांद्वारे ऊर्जा पुरवठा विनाअडथळा जारी ठेवणे होता. यावरून भारतीय नौदलाला सागरी व्यापारी मार्गांच्या सुरक्षेसाटी अलर्टवर ठेवण्यात आले आहे. भारतीय नौदल होर्मुझ सामुद्रधुनीच्या आसपासच्या घटनाक्रमांवर पूर्णवेळ नजर ठेवून आहे. व्यापारी जहाजांसोबत निरंतर संपर्क ठेवण्यात आला असून त्यांना सुरक्षित मार्गक्रमणासाठी आवश्यक सल्ले दिले जात असल्याचे बैठकीत सैन्यनेतृत्वाने स्पष्ट पेले.

सरकार आणि सैन्यनेतृत्वादरम्यान समन्वयासोबत पुढील 48 तासांसाठी विशेष सतर्कता बाळगली जातेय. नौदलाच्या रॅपिड रिस्पॉन्स टीम्सना स्टँडबायवर ठेवण्यात आले असून स्थिती बिघडल्यास तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे.

संरक्षण सचिवांनी बैठकीत आपत्कालीन प्रोटोकॉल आणि आकस्मिक योजनांबद्दल माहिती दिली. नौदलाच्या युद्धनौका आणि सागरी गस्त विमानांना रणनीतिक स्वरुपात तैनात करण्यात आले असून कुठलाही धोका उद्भवल्यास त्वरित प्रत्युत्तर दिले जाणार आहे. भारताच्या हितसंबंधांचे रक्षण कुठल्याही स्थितीत केले जाणार असल्याचे सीडीएस चौहान यांनी स्पष्ट केले.

 

?

Comments are closed.