विश्वगुरु असल्याचा आव न आणता देशात गॅस आणि इंधन पुरवठ्याचे नियोजन करा; हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
“देशात सध्या इंधन आणि एलपीजी गॅसचा जो तुटवडा निर्माण झाला आहे, त्याला सर्वस्वी सरकारचा नियोजनाचा अभाव कारणीभूत आहे. उगाच ‘विश्वगुरु’ असल्याचा पोकळ आव न आणता, सरकारने जमिनीवर उतरून सर्व घटकांशी चर्चा करावी आणि जनतेला इंधन टंचाईच्या खाईतून बाहेर काढावे,” अशा जळजळीत शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला. दादर येथील टिळक भवनमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ते असे म्हणाले आहेत.
यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही बोचरी टीका केली. फडणवीसांनी केलेल्या वैयक्तिक टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, “हर्षवर्धन सपकाळ ते बिनडोक सपकाळ असा फडणवीसांचा प्रवास झाला आहे. बुद्धी ही केवळ एका विशिष्ट वर्गाचीच मक्तेदारी आहे, असा त्यांचा समज असल्याने त्यांना माझे डोके दिसत नसावे. याच प्रतिगामी विचाराने एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारला होता आणि बहुजन समाजाला ज्ञानापासून वंचित ठेवले होते. फडणवीस यांच्या पोटातले आता ओठावर आले आहे,” असे सांगत त्यांनी ‘गेट वेल सून फडणवीस’ असा खोचक टोला लगावला.
देशातील गॅस संकटावर बोलताना सपकाळ यांनी सरकारला धारेवर धरले. युद्धामुळे परिस्थिती बिघडली असली तरी सरकारकडे कोणतेही नियोजन नसल्याने सर्वसामान्यांना फटका बसत असल्याचे त्यांनी सांगितले. “गॅस अभावी हॉटेल आणि खानावळी बंद पडणे देशाला परवडणारे नाही. सरकारने केवळ मोठमोठ्या गप्पा न मारता इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत,” असा इशारा त्यांनी दिला.
Comments are closed.