विमान क्रॅश: आम्ही सत्याच्या बाजूने आहोत
संसदेत विमान वाहतूक मंत्र्यांचे स्पष्टीकरण, विदेशी प्रसारमाध्यमांवर टीका, संसद अधिवेशनाचा प्रारंभ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ झाला आहे. सोमवारी प्रथम दिवशी अहमदाबाद येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या एअर इंडिया विमान दुर्घटनेसंबंधी नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी वक्तव्य केले. या प्रकरणात पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांनी भ्रमित करणारे वृत्तांकन केले आहे, अशी टीका त्यांनी केली. आतापर्यंत तपासात जे सत्य उघड झाले आहे, त्याबाजूने भारत सरकार आहे, अशी स्पष्टोक्ती करत त्यांनी विदेशी वृत्तमाध्यमांचा समाचार घेतला.
या प्रकरणात एअर इंडियाने यापूर्वीच योग्य ती कार्यवाही करण्यास प्रारंभ केला आहे. या कंपनीने आपल्या बोईंग 787 आणि बोईंग 737 या प्रवासी विमानांमधील इंधन स्वीच ऑफ यंत्रणेचे परीक्षण करण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. नागरी विमान अपघात प्राधिकरणाने या दुर्घटनेची सखोल चौकशी चालविली असून प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. मात्र, केंद्र सरकार अंतिम अहवाल सादर झाल्याशिवाय अधिक माहिती देणार नाही. आम्ही अंतिम अहवालाच्या प्रतीक्षेत आहोत. तो सादर होईपर्यंत कोणीही घाईघाईने निष्कर्ष काढून भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन त्यांनी निवेदनात केले.
दबावाचा प्रयत्न निष्फळ ठरणार
या दुर्घटनेच्या प्रकरणात केंद्र सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न बाह्या शक्तींकडून केला जात आहे. गैरसमज पसरवून हेतुपुरस्सर गोंधळ निर्माण केला जात आहे. तथापि, केंद्र सरकार अशा कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. या प्रकरणी जे सत्य आहे. ते जनतेसमोर ठेवले जाईल आणि अंतिम अहवाल सादर झाल्यानंतर आवश्यकता असल्यास कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
राघव च•ा यांची मागणी
डीजीसीए या प्राधिकरणाला स्वायत्त संस्था बनविण्याची मागणी आम आदमी पक्षाचे खासदार राघव च•ा यांनी राज्यसभेत केली. भारतात नागरी विमान वाहतूक क्षेत्र विस्तारत आहे. तथापि, प्रवाशांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नागरी विमान वाहतूक महासंचालक (डीजीसीए) या संस्थेला स्वायत्तता दिली जाण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन त्यांनी त्यांच्या निवेदनात केले.
Comments are closed.