पहिल्याच हंगामात कर्णधार म्हणून आयपीएल जिंकणारे खेळाडू; यादीत फक्त चार जणांचा सहभाग

आगामी आयपीएल 2026 हंगामाच्या तोंडावर विविध विक्रमांची चर्चा रंगू लागली आहे. त्यात सर्वात वेगळा आणि दुर्मिळ विक्रम म्हणजे पहिल्याच हंगामात कर्णधार म्हणून विजेतेपद पटकावणे. आयपीएलच्या तब्बल 18 वर्षांच्या इतिहासात हा पराक्रम केवळ चार खेळाडूंनाच साध्य झाला आहे. विशेष म्हणजे, या चारपैकी तीन खेळाडू भारतीय आहेत.

या यादीतील पहिले नाव शेन वॉर्न यांचे आहे. 2008 साली आयपीएलचा पहिला हंगाम खेळवण्यात आला आणि वॉर्न यांच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स संघाने विजेतेपद पटकावले. हा आयपीएल इतिहासातील पहिलाच हंगाम असल्यामुळे त्यांचे यश अधिक ऐतिहासिक मानले जाते.

यानंतर दुसरे नाव रोहित शर्माचे आहे. 2013 साली त्याने मुंबई इंडियन्स संघाची धुरा सांभाळत पहिल्याच हंगामात विजेतेपद मिळवून दिले. याआधी अनेक दिग्गज कर्णधार असूनही संघाला हा मान मिळाला नव्हता.

तिसऱ्या क्रमांकावर हार्दिक पांड्याचे नाव येते. 2022 मध्ये त्याने नव्या गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व करत पदार्पणाच्या हंगामातच ट्रॉफी जिंकली. संघ आणि कर्णधार दोघांचाही तो पहिलाच हंगाम असल्यामुळे हा विक्रम अधिक खास ठरला.

या यादीत चौथे नाव आहे रजत पाटीदारचे आहे. मागील वर्षी त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला पहिल्यांदाच विजेतेपद मिळवून दिले. विशेष म्हणजे, याआधी विराट कोहली यांच्यासारख्या दिग्गजांनी संघाचे नेतृत्व केले होते, मात्र त्यांना हा किताब जिंकता आला नव्हता.

एकूणच, आयपीएलसारख्या स्पर्धेत पहिल्याच हंगामात कर्णधार म्हणून यश मिळवणे ही मोठी कामगिरी मानली जाते. त्यामुळे या चार खेळाडूंनी केलेला पराक्रम क्रिकेट इतिहासात कायम लक्षात राहणारा ठरला आहे.

Comments are closed.