पंतप्रधानांच्या 25 वर्षांच्या संवैधानिक पदावरील कारकिर्दीवरून संजय राऊत यांचा घणाघात; वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या ‘सेवा संकल्प अभियानावर’ केला सवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सप्टेंबर महिन्यात वाढदिवस असून त्यांनी संविधानिक पदावर 25 वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने ‘सेवा संकल्प अभियान’ राबवले जात आहे. या अभियानावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मोदींवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. पंतप्रधानांनी संविधानिक पदावर राहून नेमकी काय सेवा केली आणि देशासाठी त्यांचा असा कुठला संकल्प आहे, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
संजय राऊत यांनी सरकारवर टीका करताना म्हटले आहे की, हे डरपोक लोकं आहेत आणि हा कसला सेवा संकल्प अभियान आहे. गेल्या 25 वर्षांमध्ये त्यांनी नेमकी कोणाची आणि काय सेवा केली अन् काय संकल्प केले, हे संपूर्ण देश पाहत आहे. मोजक्या दोन-चार उद्योगपतींची सेवा करण्यापलीकडे, आपल्या गोटातल्या उद्योगपतींचे लाखो कोटींचे कर्ज माफ करण्यापलीकडे आणि देशातील सार्वजनिक संपत्ती उद्योगपतींना मातीमोल भावात विकण्यापलीकडे पंतप्रधानांनी संवैधानिक पदावर राहून देशासाठी कोणती सेवा केली आणि त्यांचा असा कुठला संकल्प आहे, असा सवाल त्यांनी केला. तसेच, 2046 चा संकल्प घेऊन बसले असून तोपर्यंत कोण जगणार, 2046 ला विकसित भारत होईल असे म्हणतात, मग मागची 25 वर्षे काय केले, असा जाब विचारत हे सेवा संकल्पवाले या देशाच्या जनतेला त्यांचे घरगडी समजतात का, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय दर्जाला साजेसा मेनू तिथे ठेवावा लागतो
संजय राऊत यांनी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या गाला डिनरच्या मेन्यूवरुन टोमणा मारला. ते म्हणाले की, पुतिन किंवा इतर देशांचे नेते जेव्हा येतात, तेव्हा प्रसिद्ध झालेल्या जेवणाच्या मेनूमध्ये खांडवी, ढोकळा वगैरे आणि उकडलेल्या भाज्या, कच्च्या भाज्यांचा समावेश असतो. हे सगळे लोक मांसाहारी असताना किंवा आफ्रिका, सौदी अरेबिया व इतर देशांतले लोक काय इथे खांडवी, ढोकळा किंवा शेवगाटे खायला आले आहेत का, असा सवाल त्यांनी केला. आंतरराष्ट्रीय दर्जाला साजेसा मेनू तिथे ठेवावा लागतो आणि त्यांचे नेहमीचे अन्न ठेवायला पाहिजे. भारताची ओळख अन्न म्हणून असायलाच पाहिजे, पण तुम्ही खिचडी खाता म्हणून तुमच्या सुप्रीम लीडर्सना किंवा अन्य परदेशी नेत्यांनाही खिचडी खायला घालायची हे योग्य नाही. तो मेनू बघून तुम्ही सुद्धा जेवायला जाणार नाही, अशी टीका करत रशियन अध्यक्ष पुतिन आणि इतर नेत्यांनी बाजूच्या करीम रेस्टॉरंटमधून पार्सल मागवून जेवले असतील, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
Comments are closed.