पंतप्रधान मोदी, इलेव्हन जिनपिंग बैठकीने पुष्टी केली
कालावधीही ठरला, व्यापारशुल्कासंबंधी चर्चा शक्य
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात प्रत्यक्ष होणे आता निश्चित झाले आहे. हे दोन्ही नेते 31 ऑगस्टला, अर्थात, येत्या रविवारी ही भेट होणार आहे. भारत आणि चीन यांच्यात व्यापार आणि इतर सहकार्य वाढविण्यासमवेतच अमेरिकेने लागू केलेल्या व्यापार शुल्कावरही त्यांच्यात चर्चा होणे शक्य आहे. त्यामुळे ही भेट अत्यंत महत्वाची मानण्यात येत आहे. चीनमधील तियानजीन येथे ‘शांघाय सहकार्य संघटने’ची शिखर परिषद होत आहे. या परिषदेचा प्रारंभ येत्या रविवारपासून होणार असून ती येत्या सोमवारपर्यंत चालणार आहे. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहभागी होणार असून ते उद्या शनिवारी चीनच्या दौऱ्यासाठी प्रायाण करतील अशी शक्यता आहे.
सात वर्षांनंतर दोन्ही नेत्यांची चीनमध्ये भेट होणार असल्याने तो केवळ या दोन देशांच्याच नव्हे, तर जगाच्या उत्सुकतेचा विषय आहे. या परिषदेत 20 देशांचे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन या परिषदेत सहभागी होणार असून सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीत या परिषदेला अन्यन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. अमेरिकेच्या व्यापार शुल्क धोरणावर या परिषदेत उघड चर्चा होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, नेत्यांच्या प्रत्यक्ष भेटींमध्ये हा मुद्दा आणि त्यामुळे निर्माण झालेली जागतिक परिस्थिती, यांच्यावर चर्चा होणें अटळ आहे, असे मत अनेक जागतिक राजकीय अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. भारत या परिषदेत दहशतवादाचा मुद्दाही स्पष्टपणे उपस्थित करणार , या परिषदेने दहशतवादाला विरोध करणारी ठोस भूमिका घ्यावी, असा आग्रह धरणार आहे. दहशतवादाच्या संदर्भात चीनची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे.
आतापर्यंतचे सर्वात मोठे संमेलन
शांघाय सहकार्य संघटनेचे हे आतापर्यंतचे सर्वात मोठे संमेलन असेल, अशी माहिती देण्यात आली. त्यात भारत, रशियासह अनेक देशांचे नेते समाविष्ट होतील. शांघाय सहकार्य परिषदेचा विस्तार करण्याच्या दृष्टीने या संमेलनात धोरण निश्चिती होण्याची शक्यता असून तसे झाल्यास तो जगाला एक महत्वाचा संदेश असेल, अशीही चर्चा जागतिक राजकीय वर्तुळात केली जात आहे.
पुतीन-जिनपिंगही भेटणार
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यातही या परिषदेच्या निमित्ताने शिखर परिषद होण्याची शक्यता आहे. ही भेटही अत्यंत महत्वाची मानण्यात येत आहे. सध्या चीन हा रशियाच्या कच्च्या इंधन तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार देश आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापार वाढविण्याच्या दृष्टीने चर्चा केली जाईल, अशी माहिती रशिया आणि चीनच्या सूत्रांनी दिली.
पंतप्रधान मोदी-जिनपिंग भेटीची उत्सुकता
भारत आणि चीन हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी मानले जातात. मात्र, वेगाने परिवर्तीत होणाऱ्या जागतिक परिस्थितीमुळे त्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे, असे दिसून येत आहे. जिनपिंग हे स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करणार आहेत. या दोन नेत्यांच्यामध्ये होणाऱ्या प्रत्यक्ष भेटीसंबंधी उत्सुकता निर्माण झाली असून ही भेट कदाचित भारत आणि चीन हे दोन देश, तसेच जगाचीही भू-राजकीय समीकरणे पलटविणारी असू शकते, अशी चर्चा आहे. रशिया, भारत आणि चीन हे देश एका वळणावर येण्याच्या प्रक्रियेचा प्रारंभ या भेटीतून होऊ शकतो, असे काही तज्ञांचे मत आहे. मात्र, त्याचवेळी अन्य काही तज्ञांनी भारताने चीनपासून सावध रहावे, अशी सूचनाही केली आहे. अमेरिकेशी व्यापारी संबंध ताणले गेले असले तरी चीनवर डोळे झाकून विश्वास टाकण्यासारखी परिस्थिती नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. अर्थातच, भारताचे धोरणकर्ते योग्य विचार करुनच साधक-बाधक निर्णय घेतील, हे निश्चित मानण्यात येत आहे.
परिषद ‘गेम चेंजर’ ठरणार ?
- भारत, चीन, रशिया एकत्र येण्याच्या दृष्टीने परिषदेला जागतिक महत्व
- अमेरिकेच्या व्यापार शुल्क धोरणामुळे भारत-चीन हे एकमेकांच्या नजीक
- परिषदेत संमत होणाऱ्या प्रस्तावाकडे सदस्य देशांप्रमाणेच जगाचेही लक्ष
Comments are closed.