पंतप्रधान मोदींची सेक्रेटरीशी चर्चा

युद्धसज्जतेचा घेतला आढावा, डोवालही उपस्थित

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण विभागाचे सचिव राजेश कुमार सिंग यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली आहे. रविवारी त्यांनी वायुदलाचे प्रमुख अमर प्रीत सिंग यांच्याशी चर्चा केली होती. गेल्या काही दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन्ही सेनादलांचे प्रमुख आणि संयुक्त प्रमुखांशी सविस्तर चर्चा करुन परिस्थितीची नेमकी माहिती घेतली आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. भारताने पाकिस्तानला धडा शिकवावा, अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी, देशवासियांच्या मनात जे आहे, तेच घडले असे आश्वासन रविवारी दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या सेनादलांवर पूर्ण विश्वास व्यक्त केला असून पहलगाम हल्ल्याचा प्रतिशोध केव्हा, कसा आणि कुठे घ्यायचा, याचे पूर्ण उत्तरदायित्व सेना दलांवर सोपविले आहे. तीनी सेनादलांकडून जोरदार युद्धाभ्यास केला जात असून भारत योग्य संधीच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येते.

12 दिवसांचा कालावधी

पहलगाम हल्ल्याला आता 12 दिवस उलटून गेले आहेत. त्या हल्ल्यात 25 पर्यटक आणि 1 स्थानिक युवकाची हत्या करण्यात आली होती. पुरुष पर्यटकांना त्यांचा धर्म विचारुन गोळ्या घालण्यात आल्या होत्या. तेव्हापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात कमालीचा तणाव असून भारताने पाकिस्तानला धडा शिकविण्याचा निर्धार केला आहे. भारताकडून प्रतिशोधाची कृती केव्हा केली जाणार याची साऱ्या देशवासियांना प्रतीक्षा असून लवकरच पाकिस्तानला  त्याच्या दुष्कृत्यासाठी मोठी शिक्षा दिली जाणार, असा साऱ्यांचा विश्वास आहे.

झेलम आणि चिनाबचे पाणी अडविले

भारताने आतापर्यंत पाकिस्तानविरोधात अनेक उपाययोजना केल्या आहेत.  1960 चा सिंधू जलवितरण करार स्थगित केला आहे. तसेच झेलम आणि चिनाब यांचे सिंधू नदीला मिळणारे पाणी पुष्कळ प्रमाणात अडविले आहे. याचा काहीसा फटका पाकिस्तानला बसला आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

पुन्हा अणुबॉम्बची धमकी

पाकिस्तानच्या एका मंत्र्याने पुन्हा भारतावर अणुबॉम्ब टाकण्याची धमकी दिली आहे. भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यास भारताला अणुबॉम्बचा दणका देण्यात येईल. आम्ही आमची अण्वस्त्रे केवळ शोभेसाठी तयार केलेली नाहीत. ती भारतासारख्या शत्रूसाठीच आहेत, अशी दर्पोक्ती या मंत्र्याने केली आहे.

पंतप्रधान मोदी यांचा दौरा रद्द

दुसऱ्या महायुद्धातील विजय साजरा करण्यासाठी रशियामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले आहे. तथापि, पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या वातावरणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा दौरा रद्द केला असून भारतीय सेना दलांच्या अधिकाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सततचा संपर्क आहे.

Comments are closed.