पंतप्रधान मोदी यांच्या पुतीन यांच्याशी चर्चा
द्विपक्षीय परिषदेसाठी भारतात येण्याचे आमंत्रण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी भारत-रशिया भागीदारी, युक्रेन संघर्ष आणि इतर अनेक मुद्यांवर दूरध्वनीवरून चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी भारत-रशिया भागीदारी मजबूत करण्याबद्दलही चर्चा केली. त्याचवेळी, मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना वार्षिक द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी भारतात येण्याचे आमंत्रण दिले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्क्यांपर्यंत कर लादून भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असतानाच दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांमध्ये झालेल्या या चर्चेकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. दूरध्वनीवरील चर्चेमध्ये पुतीन यांनी पंतप्रधान मोदींना युक्रेन युद्धाची माहिती दिली. तसेच पंतप्रधान मोदींनी संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणासाठी भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंस्टाग्रामवर या चर्चेसंबंधीची माहिती व्हायरल केली. ‘माझे मित्र राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी खूप चांगले आणि तपशीलवार संभाषण झाले. युक्रेनशी सुरू असलेल्या संघर्षासंबंधीच्या ताज्या घडामोडी शेअर केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानले. आम्ही आमच्या द्विपक्षीय अजेंड्यातील प्रगतीचा आढावा घेतला आणि भारत-रशिया विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ करण्यासाठी आमची वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली. या वर्षाच्या अखेरीस राष्ट्रपती पुतीन यांचे भारतात स्वागत करण्यास मी उत्सुक आहे’, असे मोदींनी सोशल मीडियावर म्हटले आहे.
ब्राझीलच्या राष्ट्रपतींशीही संवाद
यापूर्वी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्राझीलचे राष्ट्रपती लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांचा फोन आला होता. यावेळी झालेल्या संवादात पंतप्रधानांनी गेल्या महिन्यातील केलेल्या ब्राझील दौऱ्याच्या आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी व्यापार, तंत्रज्ञान, ऊर्जा, संरक्षण, शेती, आरोग्य आणि लोकांमधील संबंधांमध्ये सहकार्य मजबूत करण्यासाठी एका चौकटीवर सहमती दर्शविली. या चर्चेच्याआधारे, त्यांनी भारत-ब्राझील धोरणात्मक भागीदारीला नवीन उंचीवर नेण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवर विचारांची देवाण-घेवाण केली. तसेच दोन्ही नेत्यांनी संपर्कात राहण्याचे मान्य केले.
Comments are closed.