जागतिक अर्थव्यवस्था अनिश्चितता अन् अस्थिरतेचा सामना करतेय, नरेंद्र मोदींचा स्वदेशीचा नारा

वाराणसी: पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे सुमारे 2,200 कोटी रुपयांच्या विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. वाराणसीमधून पीएम किसान सन्मान निधीच्या 20 व्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं.  नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतील कार्यक्रमातून स्वदेशीचा नारा दिला. याशिवाय व्होकल फॉर लोकल हा मंत्र आचरणात आणा, असं आवाहन देखील केलं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केलेली असताना नरेंद्र मोदींनी स्वदेशीचा नारा देणं महत्त्वाचं मानलं जात आहे.

नरेंद्र मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची आठवण करुन देत सर्वांनी स्वदेशीची शपथ घ्यावी असे आवाहन  केले. कोणत्याही भारतीयाच्या घामातून आणि प्रयत्नांतून तयार झालेली कोणतीही वस्तू म्हणजे स्वदेशी आहे अशी स्वदेशीची व्याख्या मोदींनी केली. नागरिकांनी व्होकल फॉर लोकल हा मंत्र आचरणात आणावा असे आवाहन त्यांनी देशाला केले.

व्यापारी, दुकानदारांना मोदींचं आवाहन

नागरिकांनी मेक इन इंडिया उत्पादनांना प्रोत्साहन देण्याची शपथ घ्यावी, असे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले. आपल्या घरात येणारी प्रत्येक नवीन वस्तू स्वदेशी असली पाहिजे आणि प्रत्येक भारतीयाने ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे ते म्हणाले. प्रत्येक व्यापारी आणि दुकानदाराने केवळ स्वदेशी वस्तू विकण्याची शपथ घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. ही कृतीच देशाची खरी सेवा असेल, असे ते म्हणाले. आगामी सणासुदीच्या काळात लोकांनी स्वदेशी उत्पादनांचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले, ही महात्मा गांधी यांना खरी श्रद्धांजली असेल, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

जागतिक अर्थव्यवस्थेसमोर अनिश्चितता अन् अस्थिरता

नरेंद्र मोदींनी जागतिक अर्थव्यवस्था सध्या अनेक अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या वातावरणाचा सामना करत असल्याचे अधोरेखित केले. अशा परिस्थितीत, जगभरातील देश आपल्या हितावर लक्ष केंद्रित करत आहेत, ही बाब त्यांनी अधोरेखित केली. आता भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, अशावेळी भारताने आपल्या आर्थिक हिताबाबत सतर्क राहिले पाहिजे, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांचे आणि लघु उद्योगांचे कल्याण आपल्या सर्वोच्च प्राधान्यक्रमावर आहे आणि सरकारही या दिशेने सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, ही बाब त्यांनी अधोरेखित केली.

विकसित भारताचे स्वप्न केवळ सामूहिक प्रयत्नातूनच साकार होईल ही बाब त्यांनी अधोरेखित केली. आपल्या भाषणाच्या समारोपात त्यांनी आज उद्घाटन झालेल्या विकास कामांबद्दल  पुन्हा एकदा जनतेचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्रीय  आणि राज्य मंत्री तसेच इतर मान्यवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले.

आणखी वाचा

Comments are closed.