भाजपा नेत्यांकडून सातत्याने सैन्य दलाचा अपमान, पंतप्रधान मोदी माफी मागावी – हर्षवर्धन सपकाळ

ऑपरेशन सिंदूरचे दैदिप्यमान यश हे हिंदुस्थानी सैन्य दलाचे असून संपूर्ण देशाला या पराक्रामचा अभिमान आहे परंतु भारतीय जनता पक्षाचे काही वाचाळवीर जाणीवपूर्वक भारतीय सैन्यदलाचा अपमान करणारी विधाने करत आहेत. मध्य प्रदेशचा एक मंत्री विजय शाह यांच्या बेताल विधानानंतर मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदिश देवडा यांनी केलेले विधान सैन्य दलाचा अपमान करणारे आहे. भाजपा नेत्यांच्या अशा वक्तव्याप्रकरणी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीच जाहीर माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, भाजपा मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्या बद्दल केलेले विधान चीड आणणारे होते, देशभरातून यावर संताप व्यक्त केला जात असतानाच आता भाजपाच्या दुसऱ्या नेत्याने वायफळ बडबड केली आहे. “संपूर्ण देश, देशाचे सैन्य आणि सैनिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चरणी नतमस्तक आहेत.” असे निर्लज्जपणाचे विधान केले आहे. हे विधान सैन्य दलाचे शौर्य, संस्कृती व परंपरेचा घोर अपमान करणारे आहे.
मंत्री विजय शाह यांच्यावर भाजपाने अद्याप कारवाई केलेली नाही. भाजपाचे नेते बेताल विधाने करत असताना नरेंद्र मोदी, अमित शाह व जे. पी. नड्डा गप्प का आहेत? भाजपा हा निर्ढावलेला व मस्तीखोर पक्ष आहे, पण जनता हा अपमान सहन करणार नाही. भाजपाचे मंत्री विजय शाह व जगदिश देवरा या दोघांवरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत या विकृतांना वेड्याच्या इस्पितळात भरती केले पाहिजे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
Comments are closed.