23 जुलैपासून यूके-मालाल्डिव्ह दौर्‍यावर पंतप्रधान

मालदीवच्या स्वातंत्र्य दिन महोत्सवातही सहभागी होणार

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 23-24 जुलै रोजी ब्रिटनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान मोदींचा हा ब्रिटनचा चौथा अधिकृत दौरा असेल. ब्रिटननंतर पंतप्रधान मोदी 25-26 जुलै रोजी मालदीवच्या अधिकृत दौऱ्यावर जातील. मालदीवचे राष्ट्रपती डॉ. मोहम्मद मोईझू यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी मालदीवला जात असून ते 26 जुलैला होणाऱ्या स्वातंत्र्य दिन महोतसवातही सहभागी होणार आहेत. पंतप्रधानांचा मालदीवचा हा तिसरा दौरा असेल. मोईझू यांनी मालदीवची सत्ता हाती घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच दौरा असेल. यादरम्यान धोरणात्मक सहकार्य वाढवण्यावर चर्चा होईल.

ब्रिटनच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी पंतप्रधान केयर स्टारर यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चा करतील. दोन्ही नेत्यांमध्ये प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवरही चर्चा होईल. पंतप्रधान मोदी त्यांच्या ब्रिटन दौऱ्यात किंग चार्ल्सलाही भेटू शकतात. दोन्ही देश व्यापक धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीवर चर्चा करताना व्यापार, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, नवोन्मेष, सुरक्षा, हवामान बदल, आरोग्य, शिक्षण आणि लोकांमधील संबंध सुधारण्याच्या मुद्यांवर भर देतील.

Comments are closed.