अमेरिका, चीन यांनी स्तुती केली

पंतप्रधान मोदी यांची सव्वातीन तासांची प्रदीर्घ मुलाखत, मांडला बालपणापासूचा जीवनपट

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञ आणि विचारवंत लेक्स फ्रिडमन यांना दिलेल्या सव्वातीन तासांच्या प्रदीर्घ मुलाखतीचा पॉडकास्ट आता प्रसिद्ध करण्यात आला आहे. पाच दिवसांपूर्वी त्यांनी ही मुलाखत दिली होती. अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांनी या मुलाखतीतील आशयाची प्रशंसा केली आहे. डोनाल्ड ट्रंप यांनी आपल्या पोर्टलवर या पॉडकास्टची लिंक प्रस्तुत केली आहे, तर चीनच्या सरकारी मुखपत्रानेही विशेष लेखाद्वारे या मुलाखतीचे कौतुक केले आहे.

या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राष्ट्रीय आणि जागतिक विषयांवर त्यांची धोरणे आणि मते व्यक्त केली आहेत. हिंदी, इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये हा पॉडकास्ट प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रकाश टाकला असून, अमेरिका, चीन आणि शेजारी राष्ट्रांशी भारत सौहार्दाचे संबंध ठेवू इच्छितो, हे स्पष्ट केले आहे. अमेरिका आणि चीन यांच्याशी भारत आपले संबंध बळकट करीत आहे. विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यात आले आहे, असे त्यांचे प्रतिपादन आहे.

बालपणापासून सर्वोच्च पदापर्यंत

या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला बालपणापासून देशाच्या सर्वोच्च नेतेपदापर्यंतचा जीवनपट उलगडला आहे. बालपणीच्या गरीबीतून आपण बरेच काही शिकलो. बालपणी आलेल्या अनुभवांमुळे आपली जडणघडण झाली. गरीबीचे चटके बसल्याने जीवनाचा खरा अर्थ कळला, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच आपल्या राजकीय प्रवासात कधीही तत्वांशी तडजोड केली नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आपली विचारसरणी घडविण्यात महत्वाचे योगदान आहे. याच विचारसरणीच्या पायावर आपण उभे आहोत, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.

ट्रंप यांचा करतात आदर

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अधिक निर्धारी झालेले दिसतात. त्यांचे आणि माझे घनिष्ट संबंध आहेत. 2019 मध्ये अमेरिकेतील प्रगट कार्यक्रम यशस्वी होण्यात ट्रंप यांचे महत्वाचे योगदान होते. ट्रंप हे अमेरिकेशी अत्यंत एकनिष्ठ असून अमेरिकेचे हित हेच त्यांचे जीवनध्येय आहे. अमेरिका प्रथम हे त्यांचे धोरण आहे. तर भारत प्रथम हे माझे ध्येय आहे. त्यामुळे आमची जवळीक ही समान ध्येयाधारित आहे. भारत आणि अमेरिका यांच्या संबंधांमध्येही ट्रंप यांच्या प्रयत्नांमुळे मोठी जवळीक निर्माण झाली असून दोन्ही देशांचे विविध क्षेत्रांमधील सहकार्य वाढले आहे, अशी मांडणी त्यांनी केली आहे.

चीनच्या मुखपत्रात प्रशंसा

या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेली मते आणि धोरणे अतियशय व्यवहार्य आणि वस्तुस्थिती आधारित आहेत, अशी प्रशंसा चीनचे सरकारी मुखपत्र असणाऱ्या ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्राने केली आहे. या वृत्तपत्रात व्यक्त होणारे विचार हे चीन सरकारचेच असतात, असे मानले जाते. भारताचा हत्ती आणि चीनचा ड्रॅगन यांचे युगुलनृत्य हेच भारत आणि चीनच्या संबंधांचे वास्तव आहे. आपला भविष्यकाळ उज्ज्वल करण्यासाठी दोन्ही देशांनी एकमेकांशी सहकार्य करणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे, अशी टिप्पणीही या वृत्तपत्राने केली.

पाकिस्तानवर आघात

भारताने पाकिस्तानशीही मैत्रीचे संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केला. तथापि, तो देश दहशतवादाचा हात सोडावयास राजी नाही. आम्ही त्या देशाचे नेते नवाझ शरीफ यांना मैत्रीचा हात पुढे केला पण आम्हाला उत्तरात द्वेषच मिळाला. त्यामुळे आम्हालाही धोरण कठोर करावे लागले. कारण आमच्या सहनशीलतेलाही मर्यादा आहेत, अशा अर्थाचे विधान त्यांनी मुलाखतीत केले.

मनमोकळी चर्चा, चपखल उत्तरे

ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लेक्स फ्रिडमन यांच्याशी प्रदीर्घ सर्वंकष चर्चा

ड गेल्या दहा वर्षांमध्ये देशाने केलेल्या प्रगतीचा आढावा, भविष्याचाही वेध

ड अमेरिका आणि चीन यांच्याशी घनिष्ट संब्  ांध स्थापण्याचा निर्धार व्यक्त

ड पाकिस्तानच्या दहशतवादावर आघात, तो सोडल्याशिवाय नाही तरणोपाय

ड भारत प्रथम हेच आपले ध्येय, देशहितरक्षणाला कधीही नाही विसरणार

Comments are closed.