पोलिसांकडून मुलींना जातिवाचक शिवीगाळ

कोथरूड पोलिसांनी तीन तरुणींना ताब्यात घेतल्यानंतर जातिवाचक शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा आरोप होत आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. मिसिंग तक्रारीनुसार संभाजीनगर पोलीस पुण्यात दाखल झाले होते. त्यानुसार संबंधित मुलींना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. व्हायरल व्हिडीओत मुलींचा आवाज आणि पोलिसांचा आक्रस्ताळी सूर ऐकू येत आहे.

सासरच्या त्रासाला कंटाळून संभाजीनगरमधील महिला पुण्यात मैत्रिणीच्या सहाय्याने तीन मुलींच्या फ्लॅटवर आली. या मुलींनी त्या महिलेला मदत केली. सासरच्यांनी तिच्या विरोधात मिसिंगची तक्रार दाखल केली होती. याच महिलेला शोधण्यासाठी संभाजीनगरचे पोलीस पुण्यात दाखल झाले होते. तिच्या मोबाईलच्या लोकेशननुसार कोथरूड परिसरात राहणाऱ्या या तीन मुलींच्या घरी गेले. त्यावेळी संभाजीनगरची महिलेली कामासाठी निघून गेली होती. मात्र या पोलिसांनी या मुलींकडे सगळी चौकशी करायला सुरुवात केली. मात्र हीच चौकशी करताना या तीन मुलींच्या फ्लॅटमध्ये घुसून त्यांचे कपडे तपासले. सोबतच त्यांना अर्वाच्य, जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

प्रकरणाची सखोल चौकशी करा – खासदार सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री यांच्याकडे या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात सखोल चौकशी करून दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणावर कोथरूड पोलिसांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Comments are closed.